मतमोजणीसाठी 20 टेबल व 60 कर्मचारी
By admin | Published: February 21, 2017 12:15 AM2017-02-21T00:15:45+5:302017-02-21T00:15:45+5:30
4 तासात निकाल : ‘नूतन मराठा’तील सभागृहात क्रीडा संकुलाकडून असणार प्रवेश
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नूतन मराठा महाविद्यालयातील सभागृहामध्ये 20 टेबल लावले जाणार आहेत. एका टेबलवर 3 कर्मचारी असतील. एकूण 60 कर्मचारी मतमोजणीच्या कामात व्यस्त असतील. जि.प.साठी 10, तर पं.स.साठी 10 स्वतंत्र टेबल असतील.
एकाच वेळी सर्व गटांचे निकाल जाहीर होतील. कुठलीही घोषणा केली जाणार नाही. चार तासात सर्व निकाल लागतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सकाळी 10 पासून सुरुवात
मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तत्पूर्वी 9.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये नूतन मराठा महाविद्यालयातील स्ट्राँग रूम उघडली जाईल. सर्व इव्हीएमबाबत खात्री केल्यानंतर मतमोजणी सुरू होईल.
जि.प.साठी दोन प्रतिनिधी, पं.स.साठी एकालाच परवानगी
जि.प.चे उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी दोन प्रतिनिधी (काउंटींग एजंट) पाठवू शकतील. तर पं.स. उमेदवारांना एकच प्रतिनिधी पाठविता येईल. याशिवाय स्वत: उमेदवार मतमोजणीच्या स्थळी उपस्थित राहू शकतील. इतरांना मतमोजणीस्थळी प्रवेश मिळणार नाही. मतमोजणी प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र निवडणूक शाखेतर्फे दिले जात आहेत.
एका टेबलवर 18 इव्हीएम
मतमोजणीसाठी एका टेबलवर एकूण 18 इव्हीएम येतील, असे अपेक्षित आहे. कर्मचारी व काउंटींग एजंट यांना मदतीसाठी परिचरांची नियुक्तीही टेबलनिहाय केली जाणार आहे.
मतमोजणीस्थळी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. यासोबत चार निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी असा ताफा असेल. मतमोजणी केंद्राच्या चारही बाजूला बंदोबस्त असेल. मुख्य द्वारावर अधिकारी नियुक्त असतील. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बंदोबस्तासंबंधी पत्र दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांनी दिली.
नूतन मराठा महाविद्यालयाचे कोर्ट किंवा हौसिंग सोसायटीच्या भागातील दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद असतील. महाविद्यालयाच्या मागच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या भागातील द्वाराने उमेदवार, अधिकारी, पत्रकार आदींना प्रवेश दिला जाईल. यामुळे जिल्हा क्रीडा संकुल ते डॉ.सुभाष चौधरी यांचे हॉस्पिटल (रिंग रोडकडे जाणारा रस्ता) हा रस्ता सकाळी 10 ते मतमोजणी पूर्ण होईर्पयत बंद राहणार आहे.
मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलास पत्र दिले आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी व नंतरही उमेदवारांच्या प्रतिनिधी, समर्थकांचे सहकार्य अपेक्षित आहे. -जलज शर्मा,
निवडणूक निर्णय अधिकारी