वृक्ष तोडल्याने 20 हजारांचा दंड
By Admin | Published: February 10, 2017 12:46 AM2017-02-10T00:46:21+5:302017-02-10T00:46:21+5:30
मनपा पर्यावरण विभागाची कारवाई : गणपतीनगरातील प्रकार, ठरावाची पहिल्यांदाच अंमलबजावणी
जळगाव : गणपती नगरातील अशोक वृक्ष व उंबराचे झाड तोडल्याप्रकरणी मनपा पर्यावरण विभागाने कन्हैय्या छाबडिया यांना 20 हजाराच्या दंडाची नोटीस बजावली आहे. दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांना एका पत्राव्दारे देण्यात आला आहे.
गणपती नगरातील तारा अपार्टमेंटमधील रहिवासी कन्हैय्या छाबडिया यांनी अपार्टमेंट परिसरातील अशोक व उंबराचे झाड मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे कोणताही अर्ज न देता विना परवानगी तोडले असल्याची मनपाकडे तक्रार करण्यात आली होती.याची दखल घेऊन प्रभाग अधिका:यांच्या माध्यमातून स्थळ पाहणी करण्यात आल्यानंतर तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आले होते. याची गंभीर दखल घेऊन उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी छाबरिया यांना गुरूवारी नोटीस बजावली.
प्रति झाड 10 हजार दंड
मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयानुसार प्रति झाड 10 हजार असे एकूण 20 हजाराच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात दंडाची रकम मनपाकडे भरली जावी व पावती सादर करावी, असे कळविण्यात आले आहे.
मुदतीत दंडाची रकम भरली न गेल्यास आपल्या विरूद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील तरतूदीनुसार व वृक्ष प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही या नोटीसीमध्ये देण्यात आला आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीची 15 रोजी बैठक
मनपा वृक्ष प्राधिकरण समितीची गेल्या महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत विना परवानगी वृक्ष तोडल्यास दंडात्मक कारवाईचा ठराव करण्यात आला होता. या ठरावाची पहिल्यांदाच अंमलबजावणी करून ही कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची गेल्या महिनाभरात सभा झालेली नव्हती. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बैठका लांबल्या. आता वृक्ष प्राधिकरण समितीची येत्या 15 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. शहरातील विविध भागातील नागरिक तसेच संस्थांकडून झाडे तोडण्याची परवानगी मागणारे 20 अर्ज वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्राप्त झाले आहेत. मागणी नुसार स्थळ पाहणीची अहवाल प्रशासनाकडून मागविण्यात आला असून त्यानंतरच परवानगी दिली जाईल.