बेस्ट सेवेसाठी २०० चालक-वाहक मुंबईला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:13+5:302020-12-06T04:17:13+5:30
एसटी महामंडळ : कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कुठल्याही सेवेवर परिणाम होणार नसल्याचा महामंडळाचा दावा जळगाव : मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद ...
एसटी महामंडळ : कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कुठल्याही सेवेवर परिणाम होणार नसल्याचा महामंडळाचा दावा
जळगाव : मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असल्यामुळे बेस्ट परिवहनतर्फे ही सेवा देण्यात येत आहे. मात्र, या सेवेसाठी चालक-वाहकांची संख्या अपूर्ण पडत असल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागातून रविवारी २०० चालक-वाहक मुंबईला रवाना होणार आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बाहेरगावी जात असताना, महामंडळाच्या कुठल्याही फेऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचा दावा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला.
जळगाव विभागातील विविध ११ डेपोंमधून चालक-वाहक मिळून २०० कर्मचारी पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये जळगाव आगारातून २५ चालक व २५ वाहक, पाचोरा, चाळीसगाव व अमळनेर आगारातून प्रत्येकी १५ चालक व १५ वाहक तर उर्वरित आगारांमधून १० चालक, १० वाहक तर काही आगारातून ५ चालक व ५ वाहक पाठविण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो:
चालक-वाहकांना सव्वादोनशे रुपये जादा भत्ता मिळणार :
चालक-वाहकांना पगाराव्यक्तिरिक्त दिवसाला सव्वादोनशे रुपये भत्ता देण्यात येणार आहे. हे कर्मचारी आठवडाभर मुंबईत राहणार असून, पुन्हा कर्मचाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली तर महामंडळाच्या सूचनेनुसार पुन्हा पुढच्या आठवड्यात दोनशे जादा चालक-वाहक पाठविण्यात येणार आहेत.
इन्फो :
बेस्टच्या सेवेसाठी २०० चालक-वाहक मुंबईला जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कुठलाही परिणाम इतर फेऱ्यांवर होणार नाही. याचे नियोजन महामंडळ प्रशासनाने केले आहे.
राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग