चाळीसगावला २०० पूरग्रस्तांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:57+5:302021-09-02T04:34:57+5:30
चाळीसगाव : बुधवारी डोंगरी व तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगत राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांचा संसार पुराच्या ...
चाळीसगाव : बुधवारी डोंगरी व तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगत राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. काहींची घरे पडल्याने ती माणसे उघड्यावर आली आहेत.
शहरातील अण्णाभाऊ साठे नगरासह बामोशी बाबा दर्गाह परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर आनंदीबाई बंकट विद्यालय व घाट रोडलगतच्या उर्दू विद्यालयात करण्यात आले आहे.
डोंगरी आणि तितूर नदीला पूर आल्याने हिरापूर रोडलगतच्या इच्छादेवी मंदिर परिसरातील नागरिकांचेही नुकसान झाले आहे. न. पा. जलतरण तलावानजीक असणाऱ्या अण्णाभाऊ साठे नगरातील ४० घरांची पडझड झाली असून अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू व सामान वाहून गेल्याने त्या व्यक्ती उघड्यावर आल्या आहेत.
या पूरग्रस्तांचे येथील आ. बं. विद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी या पूरग्रस्तांनी केली आहे. येथे मदतीसाठी न. पा. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
होते नव्हते ते गेले...
तितूर नदीला आलेल्या पुरात माझ्या घराची पडझड झाली आहे. संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. मुलांबाळांसह आम्ही उघड्यावर पडलो आहोत. आम्हाला शासनाने तातडीने मदत करावी. जेवणाचीही व्यवस्था करण्यात यावी.
-वसंत मरसाळे, पूरग्रस्त
घर पडले
पुराचा तडाखा असा बसला की, माझे घरच पडले. आम्ही कुठे राहायचे? घर पुन्हा कसे उभारायचे? असा प्रश्न पडला आहे. आम्ही मजुरी करुन गुजराण करतो. अशातच पुराने आमचे सर्वच हिरावून घेतले. शासनाने तातडीने मदत करावी.
-आशाबाई सावळे, पूरग्रस्त, चाळीसगाव
सांगा कसे जगायचे?
पत्र्याचे शेड उभारुन घर उभे केले होते. पुराच्या पाण्यात तेही वाहून गेल्याने, जगायचे कसे? हा प्रश्न पडला आहे. शासनाने घर बांधण्यासह संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी मदत करावी. कपडेही वाहून गेले आहेत.
-शारदा मरसाळे, पूरग्रस्त, चाळीसगाव.