शहरातील २०० किमी रस्त्यांचे होणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:17+5:302021-05-21T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील रस्त्यांची कामे होऊ शकली नसून, आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. शासनाने स्थगिती दिलेल्या नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील २०० किमी च्या रस्त्यांचे काम केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१२ मे रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून केल्या जाणाऱ्या ७० कोटी रुपयांच्या कामांचा ठराव रद्द करून, नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या मात्र शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून सर्व रस्त्यांची कामे करण्यात यावी असा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला होता. या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मनपा बांधकाम विभागाकडून सुरू झाले आहे. तसेच १०० पैकी ४२ कोटी रुपयांच्या निधीतून आधी तयार केलेले प्रस्ताव देखील रद्द करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे आता शंभर कोटी रुपयांचा कामातून केवळ रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.
सप्टेंबर नंतरच होणार रस्त्यांची कामे
अमृत योजनेअंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम जवळजवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात पाणी पुरवठा योजनेचे खोदकामाचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. केवळ टाक्यांचे व जोडणीचे काम शिल्लक आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून शासनाची तांत्रिक मान्यता घेऊन ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहितीही मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू असून, मान्सून दाखल होण्याआधीच डागडुजीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.
या रस्त्यांच्या कामांना देणार प्राधान्य
शंभर कोटींच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्ते देखील तयार केले जाणार आहेत. यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशन पर्यंत चा रस्ता, सुरत रेल्वे गेट ते निमखेडी पर्यंतचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते चित्र चौक, आकाशवाणी चौक ते नेरी नाका , टॉवर चौक ते अजिंठा चौक, पिंप्राळा रेल्वे गेट ते रिंग रोड परिसर, नवसाचा गणपती मंदिर, पिंप्राळा रेल्वे गेट ते गोविंदा रिक्षा स्टॉप, स्वातंत्र्य चौक ते टॉवर चौक हे रस्ते प्राधान्याने केली जाणार आहेत. यासह भोईटे नगर ते पिं प्राळा चौक, रामानंद घाट ते काव्यरत्नावली चौक, मेहरून परिसरासह जुने जळगाव परिसरातील रस्ते देखील या निधीतून तयार केले जाणार आहेत.