विद्यापीठात येणार ११ राज्यातील २०० विद्यार्थी, जळगावमध्ये ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबीर

By अमित महाबळ | Published: October 25, 2023 06:16 PM2023-10-25T18:16:45+5:302023-10-25T18:17:54+5:30

महाराष्ट्राच्या अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असणार आहे

200 students from 11 states coming to the University, National Integration Camp in Jalgaon from November 30 to December 6 | विद्यापीठात येणार ११ राज्यातील २०० विद्यार्थी, जळगावमध्ये ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबीर

विद्यापीठात येणार ११ राज्यातील २०० विद्यार्थी, जळगावमध्ये ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबीर

अमित महाबळ, जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभाग, युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली आणि रा.से.यो. प्रादेशिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर होणार असून, यामध्ये ११ राज्यातील एकूण २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

विविध राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व खाद्य संस्कृती यांचे आदान-प्रदान करणे तसेच एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना जोपासण्याचे काम या राष्ट्रीय एकात्मता शिबिरातून होत असते. त्याचाच एक भाग म्हणून हे शिबीर प्रथमच जळगावच्याविद्यापीठात होणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील २०० रा.से.यो. स्वयंसेवक आणि १५ कार्यक्रम अधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाचे असतील. एका राज्यातील पाच विद्यार्थी आणि पाच विद्यार्थिनी आणि महाराष्ट्राच्या अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असणार आहे.

शिबिर सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आणि उद्घाटनाच्या दिवशी सकाळपर्यंत शिबिरार्थींचे आगमन होणार आहे. दि. ३० रोजी शोभायात्रा झाल्यानंतर शिबिराला सुरूवात होईल. शिबिरात दिवसभर बौद्धीक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि गटचर्चा, असे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थी त्यांच्याकडील खाद्यपदार्थही बनविणार- शिबिरात दिवसभर वेगवेगळ्या राज्यातील एकत्र असतील. सायंकाळी ते आपापल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. तसेच त्यांच्याकडील विशेष खाद्यपदार्थही बनविणार आहेत, अशी माहिती रा.से.यो.चे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दिली.

या राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग- महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, तेलंगणा, ओरिसा आणि तामिळनाडू

Web Title: 200 students from 11 states coming to the University, National Integration Camp in Jalgaon from November 30 to December 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.