नशिराबादच्या बारागाड्यांना द्विशतकी परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 03:55 PM2018-03-31T15:55:50+5:302018-03-31T15:55:50+5:30
खंडेराव महाराज यात्रोत्सवात आजपासून विविध कार्यक्रम.
प्रसाद धर्माधिकारी । आॅनलाईन लोकमत
नशिराबाद, ता.जळगाव, दि. ३१ : गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास ३१ मार्च शनिवारपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रविवारी सायंकाळी ५ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल.
सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा ३१ मार्च रोजी शनिवारी सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा पंचामृत अभिषेक पूजन होईल. सायंकाळी ६ वाजता सत्यनारायण पूजन होईल. यात्रोत्सवास आरंभ होईल.
१ एप्रिल रविवारी सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा अभिषेक होईल. सायंकाळी ५ वाजता भगत सुदाम दामू धोबी यांच्याहस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता कठडे मिरवणूक निघेल. त्यानंतर रात्री ८ वाजता चंदाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. २ व ३ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे पूजन अभिषेक व रात्री ८ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम होईल.
चैत्र वद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. नशिराबाद येथील धोबी घराण्याकडे सहा पिढ्यांपासून म्हणजेच दोनशे वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. पिढ्यान्पिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळलेली आहे. दामू शंकर धोबी यांनी वयाची ८३ वर्षे ओलांडली तरी त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ते एकेकाळी नामांकित पहेलवान होते. त्यांनी सलग ३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्याआधीही कित्येक पिढ्यांपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी मोतीलाल संपत धोबी (गोमा धोबी) यांचे निधन झाले. त्यामुळे आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर उर्फ सुदाम धोबी (भगत) यांनी ही धुरा सांभाळली आहे. यंदा बारागाड्या ओढण्याच त्यांचे तिसरे वर्ष आहे. येथील बारागाड्या व खंडेराव महाराज यात्रोत्सवास अनन्य महत्व आहे. आतापर्यंत कै.रघु धोबी, कै.शंकर रघू धोबी, कै.गणपत शंकर धोबी, कै.मोतीलाल संपत धोबी यांनी बारागाड्या ओढल्या. अशी माहिती सुदाम धोबी यांनी दिली.