गुलाबरावांच्या भाषणाचा २०१६ मधील व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:36+5:302020-12-06T04:17:36+5:30
जळगाव : ठेवीदारांच्या ठेवी देण्यास सरकारला भाग पाडू, अशी चार वर्षांपूर्वी ग्वाही देणारे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या ...
जळगाव : ठेवीदारांच्या ठेवी देण्यास सरकारला भाग पाडू, अशी चार वर्षांपूर्वी ग्वाही देणारे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडल्याची टीका होऊ लागली आहे. या संदर्भातील त्यांचे भाषण असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिलेली ग्वाही पूर्ण करा, असे आव्हान जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी दिले आहे. विशेष म्हणजे जनसंग्राम संघटनेच्यावतीने करण्यात करण्यात आलेल्या उपोषणाच्या ठिकाणी त्यांनी हे भाषण केले होते. या सोबतच सहा महिने थांबा, ठेवीचे पैसे न मिळाल्यास बुटाने मारा, असे वक्तव्यदेखील गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्या विषयीचे प्रकाशित झालेले वृत्तदेखील व्हायरल होत आहे.
जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्यावतीने उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी तेथे भाषण करताना गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील तत्कालीन मंत्र्यांवर टीका केली होती. त्यांना जनतेशी काही घेणे देणे नसल्याचा आरोप केला होता. कोणता भाऊ तुमच्या सोबत नसला तरी हा गुलाबभाऊ तुमच्या सोबत असल्याचे सांगितले होते. मात्र चार वर्षे उलटले व आता बीएचआरच्या निमित्ताने ठेवीदारांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आल्याने ठेवी तर काही मिळाल्या नाही, मात्र गुलाबराव पाटील यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडल्याची टीका आता केली जात आहे.
ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळवल्याशिवाय राहाणार नाही, असे भाषण गुलाबराव पाटील यांनी केले होते. तुम्ही चिंता करू नका, हा प्रश्न अधिवेशनात मांडू, संघर्ष करू व तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडू अशी ग्वाही दिली होती. मात्र हे सर्व आश्वासने हवेत विरले असून गुलाबराव पाटील यांनाही त्याचा विसर पडल्याची टीका शिवराम पाटील यांनी केली आहे.
सहकार राज्यमंत्री झाले, मात्र उपयोग नाही
असे भाषण केल्याने देवेंद्र फडणवीस यांनी गुलाबराव पाटील यांना सहकार राज्यमंत्री बनवले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याची टीकादेखील या निमित्ताने केली जात आहे.