जामनेर आगारातून एसटीच्या २०४ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 03:43 PM2020-10-24T15:43:53+5:302020-10-24T15:46:48+5:30
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे
जामनेर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे. सहा महिने आगारातच थांबून राहिलेली एसटी आता थोड्याफार प्रमाणात धावतांना दिसत आहे. बसस्थानकावर प्रवाशांची पाहिजे तशी वर्दळ दिसून येत नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या जामनेर आगाराने सुरू केल्या, मात्र ग्रामीण भागातील गाव खेड्यातील फेऱ्या अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, सोमवार २६ ऑक्टोबरपासून जामनेर येथून जळगावसाठी पहाट पाच ते रात्रीपर्यंत प्रत्येक २० मिनिटांच्या अंतराने नियमीत सेवा सुररू होत आहे. भुसावळसाठी नियमीत फेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
व्यापारी बाजारपेठ खुली झाल्याने व शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी आणू लागल्याने तालुक्याच्या ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. दळणवळणाचे साधन म्हणून एसटीकडे पहिले जाते. सुरुवातीच्या काळात प्रवाशांमध्ये काहीशी भीती दिसत असल्याने एसटीला प्रवासी मिळत नव्हते.
जामनेर आगारातून
सुरू असलेल्या फेऱ्या २०४
रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या ३५
दररोजचे किमी साडेनऊ हजार
दररोजचे उत्पन्न २ लाख
लॉकडाऊनपूर्वी दररोज ६५० फेऱ्या व दररोजचे उत्पन्न साडे आठ लाख
जामनेर आगारातून सध्या परराज्यात सुरत व बऱ्हापूर येथील व जिल्ह्याबाहेर पुणे, नाशिक, नंदुरबार व बुलढाणा येथील नियमित फेऱ्या सुरू आहेत. जामनेर जळगाव अर्ध्या तासाच्या अंतराने गाडी सोडली जाते. भुसावळला दिवसातून १२ फेऱ्या होतात. ग्रामीण भागात १२ टक्के वाहतूक सुरू झाली असून कापूस वेचणी आदी शेतीची कामे सुरू असल्याने प्रवासी वाहतूक मंदावल्याने दिसून येते, अशी माहिती आगारप्रमुख कमलेश धनराळे यांनी दिली.