चाळीसगावात 'त्यांच्या' दातृत्वाने उजळणार २१ रुग्णांच्या नेत्रज्योती...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:20 PM2018-02-05T21:20:34+5:302018-02-05T21:23:06+5:30
रोटरी क्लब आॅफ चाळीसगावच्या माध्यमातून लवकरच या दातृत्वाच्या दिव्याने २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या नेत्रज्योती पुन्हा उजळणार आहे.
जिजाबराव वाघ/आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.५ : वर्षश्राद्धाचं काहीसं शोकाकुल वातावरण. मंत्रोच्चारात सुरु असणारा पुजाविधी. मृत व्यक्तिच्या स्मृतीप्रित्यर्थ आप्तेष्टांना काही तरी भेटवस्तू देण्याची लगबग. मात्र याचंवेळी दोघा मुलांनी आईच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी मोतीबिंदू असणा-या गरजू रुग्णांना ५४ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. रोटरी क्लब आॅफ चाळीसगावच्या माध्यमातून लवकरच या दातृत्वाच्या दिव्याने २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या नेत्रज्योती पुन्हा उजळणार आहे. परंपरेला टाळून नवा आदर्श निर्माण करणा-या रामकृष्ण व प्रभाकर निंबा शिरुडे यांचं कौतुक होत आहे.
कै. शांताबाई निंबा शिरुडे यांचे वर्षश्राद्ध नुकतचं झालं. लाडशाखीय वाणी समाजात मृत व्यक्तिच्या स्मृतीप्रित्यर्थ नातेवाईकांना भांड्याच्या रुपात भेट वस्तू देण्याची पारंपारिक पद्धत आहे. मात्र अलिकडे सामाजिक घुसळण होऊन समाजपयोगी उपक्रम राबविण्याकडे समाजाचा कल वाढला असून शिरुडे परिवाराने एक पाऊल पुढे टाकले आहे.
प्रभाकर निंबा शिरुडे यांना रोटेरियन भास्कर पाटील यांनी आईच्या स्मृती प्रित्यर्थ समाजहिताच्या उपक्रमास मदत करण्याचा सल्ला दिला. यावर प्रभाकर व रामकृष्ण या दोघा भावंडांनी रोटरी क्लबतर्फे ६८ गरजू रुग्णांवर होत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी ५४ हजार रुपयांची मदत दिली. शिरुडे बंधूंच्या दातृत्वातून २१ गरजू रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असून त्यांना नवी दृष्टीच प्राप्त होणार आहे. याचं कार्यक्रमात शिरुडे भावंडांनी क्लबचे अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे यांच्याकडे ५४ हजाराचा धनादेश सुपूर्द केला. परंपरेला छेद देतांना सामाजिक कामांची नवी वाट निर्माण करणा-या शिरुडे परिवाराच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी योगेश शिरुडे, हिरालाल शिनकर, प्रफुल्ल शिरुडे, दिनेश पाखले, किरण कोतकर यांनी सहकार्य केले. रोटरीचे राजेंद्र कटारिया, ब्रिजेश पाटील, विनोद बोरा, समकित छाजेड, रोशन ताथेड, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.