मुक्ताईनगरला कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन २१ जणांची पुष्पगुच्छ व टाळ्या वाजवून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:11 PM2020-05-26T15:11:08+5:302020-05-26T15:11:20+5:30
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या २१ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची कोविड सेंटरमध्ये टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने येथील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या २१ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची मंगळवारी सकाळी कोविड सेंटरमध्ये टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
येथील कोविड सेंटरमध्ये दाखल ३४ पैकी २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, हे सर्व निगेटिव्ह आले आहेत, तर १३ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.
३४ संशयितांमध्ये प्राप्त २१ अहवालात बोदवड येथील ९, रुईखेडा येथील ६, मुक्ताईनगर ६ अशा २१ संशयितांचे अहवाल प्राप्त आहेत. सर्व निगेटिव्ह आहेत तर निमखेडी बुद्रूक येथील ७, मुक्ताईनगर येथील शांतीनगर भागातील ३, डोलारखेडा येथील १, रुईखेडा येथील मयत १ आणि तळवेल येथील १ अशा १३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, कोविड सेंटरमधून सुटी मिळालेल्या २१ जणांना तहसीलदार श्याम वाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी नीलेश पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत टाळ्यांच्या गजरात कोविड सेंटरमधून निरोप देण्यात आला.
या वेळी तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील, डॉ.इम्रान खान, डॉ.स्नेहल तायडे, सुपरवायझर अर्जुन काळे, आरोग्य परिचारक प्रदीप काळे, परिचारिका जे.एम.थिटे, प्रशांत मडावी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन प्रदीप काळे यांनी केले.