पारोळा तालुक्यातील 21 गावांना भीषण पाणी टंचाई
By Admin | Published: June 22, 2017 05:06 PM2017-06-22T17:06:01+5:302017-06-22T17:06:01+5:30
पावसाळ्यातही सात गावांना टॅँकरनेपाणी पुरवठा
ऑनलाईन लोकमत
पारोळा,दि.22 : पावसाळा सुरू झालेला आहे. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने, तालुक्यात आजही 21 गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई आहे. यात सात गावांना टँकरने पाणी पुरवठा, तर पाच गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 20 जूनर्पयत आठ लाखाचा खर्च झाला आहे.
तालुक्यात बोरी धरण वगळता सर्व धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. भोकरबारी, इंदासी, खोलसर, सावरखेडे, शिरसमणी, कंकराज, लोणी यासर्व धरणात मृतसाठा असल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
तालुक्यात वाघ्रा, वाघरी, मोहाडी, दहीगाव, खेडीढोक, हणुमंतखेडा, मोरफळ या सात गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. या टँकर डिङोल चालकाचा पगारावर साडेचार लाखाचा निधी खर्च झालेला आहे.
तर जिराळी गावाला मंजाबाई करंजे, वडगाव प्र.अ.गावाला भिला ढोमण पाटील, कोळपिंप्री गावाला रेश्माबाई नानाभाऊ पाटील, आंबापिंप्री येथे भिकन सखाराम पाटील, शेळावे खु. गावाला प्रकाश यादव पाटील या शेतक:यांच्या खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या शेतक:यांना 400 रुपये रोज प्रमाणे विहीर अधिग्रहणाचा मोबदला देण्यात येत आहे. 20 जून अखेर या सर्व अधिग्रहीत विहिरीसाठी तीन लाख 25 हजाराचा खर्च देण्यात आला आहे. एकूण सात लाख 75 हजारांचा खर्च पाणी टंचाई निवारणासाठी करण्यात आला आहे.
तर सबगव्हाण आणि शिरसोदे गावांना पाणी टंचाई निवारणासाठी टँकरची मागणी केली आहे. मागणी प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा अमळनेर कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. तर पुनगाव, पोपटनगर, भिलाली, भोलाणे, बहादरपूर, सांगवी, नेरपाट या गावांचे टँकर मंजुरीचे प्रस्ताव तहसीलदार पारोळा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. जून महिन्यात भीषण पाणी टंचाई समस्या निर्माण झाली. शिरसोदे, बहादरपूर या गावांना नागरिक 50 रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. 20 ते 25 दिवसाआड पाणी या गावांना मिळत आहे.