भडगाव तालुक्यात २२ कोटी रुपये दुष्काळी अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:15 PM2019-05-20T18:15:24+5:302019-05-20T18:15:55+5:30
१९ हजार २५६ शेतकऱ्यांना लाभ ; वंचित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा
भडगाव : शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला असल्याने भडगाव तहसील प्रशासनास शासनाकङुन २२ कोटी ६२ हजार ६५२ रुपये दुष्काळी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली होती. बहुतांश रक्कम ही मार्च अखेरीसच तालुक्यात वाटप करण्यात आली आहे. यात जिरायत व बहुवार्षिक फळबागायती क्षेत्राचा समावेश आहे.
जिरायत क्षेत्रासाठी एकुण १७ कोटी ९२ लाख ८५ हजार ६८४ इतके दुष्काळी अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले आहे. तसेच बहुवार्षिक फळपिकासाठी एकूण १३ कोटीपैकी मार्चअखेर ४ कोटी ७ लाख ७६ हजार ९६८ रुपयांचे अनुदान वाटपाची कार्यवाही महसुल प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. बहुवार्षिक फळपिकाचा लाभ तालुक्यात एकूण ५ हजार ४११ शेतकºयांना मिळाला आहे. जिरायत व बहुवार्षिक फळपिकाचा अनुदानाचा लाभ तालुक्यात एकुण १९ हजार २५६ शेतकºयांना मिळाला आहे.
भडगाव तहसील प्रशासनामार्फत अनुदान वाटपाची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात आली असली तरी आता उर्वरीत वंचित शेतकºयांना दुष्काळी अनुदानाचा लाभ तात्काळ मिळावा, अशी मागणी तालुक्यातील अनुदानापासुन वंचित शेतकरी वर्गातून होत आहे. जिरायत क्षेत्रासाठी ६८०० रुपये तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार रुपये अनुदानाची रक्कम शेतकºयांना मिळणार आहे. सुरुवातीस जिरायत क्षेत्रासाठीच सहा हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान वाटपाची कार्यवाही करण्यात आली. फळपिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बहुवार्षीक फळपिकाचे अनुदान तालुक्यात वाटप करण्यात आले आहे.
पिकांचे झाले होते नुकसान
भडगाव तालुक्यात खरीप हंगाम सन २०१८ ला कमी पावसाळा झाला. त्यात पाणी टंचाई पाहता शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती पिकांवर केलेला शेतकºयांचा खर्चही निघाला नाही. शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शेतकºयांसह सर्व स्तरातून करण्यात आली. आमदार किशोर पाटील यांनीही भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रसमार्फतही निवेदने शासनास दिली होती. सर्व स्थिती पाहता शासनाने भडगाव तालुका दुष्काळी जाहीर केला.
अनुदानासाठी
२ हेक्टरची मर्यादा
शासनाने जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये तर बहुवार्षीक फळपिकांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी अनुदानाची रक्कम जाहीर केली आहे. शेतकºयांना यासाठी २ हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे. दुष्काळी अनुदानाची तालुक्यासाठी तहसील प्रशासनाने एकुण २५ कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. यापैकी तहसील प्रशासनास आतापर्यंत एकुण २२ कोटी रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त झाली होती. अनुदान वाटपाची कार्यवाही, याद्या बनविणे आदी कामे महसुल प्रशासनामार्फत युद्धपातळीवर वेळोवेळी होत असल्याचे दिसून आले.
यापूर्वीच गावागावात तलाठी कार्यालयात बँक अकाऊंट नंबर आदी देण्यासाठी शेतकरी वर्ग गर्दीने दिसून येत होते.
याबाबत तहसीलदार यांनी तालुक्यातील तलाठ्यांची बैठक घेतली होती. ही अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर तहसील प्रशासन धनादेशद्धारे जमा करण्यात आली आहे. अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शेतकºयांची शहरासह तालुक्यातील बँकांवर अजूनही गर्दी दिसून येत आहे.