चितळ हरणांचे २२ शिंगे आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:34 AM2019-01-22T01:34:16+5:302019-01-22T01:36:47+5:30
डोलारखेडा जंगलात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चितळ जातीच्या हरणांची २२ शिंगे एका पोत्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर : तालुक्यातील डोलारखेडा जंगलात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चितळ जातीच्या हरणांची २२ शिंगे एका पोत्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हरणांची शिकार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यातच हरणांची शिकार केल्याप्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना वन कोठडी देण्यात आली असतानाच हे प्रकरण उघडकीस आल्याने यात हरणांची देखील शिकारच झाल्याचे निदर्शनास येत आहे.
सोमवारी दुपारी फिरत्या गस्त पथकाचे वनक्षेत्रपाल धनंजय पवार, वढोदा वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण तसेच डोलारखेडा वनपाल पी. टी. पाटील व त्यांच्या समवेत आठ कर्मचारी हे डोलारखेडा वन हद्दीत गस्त घालत असताना एका पोत्यामध्ये चितळ जातीच्या हरणांची २२ शिंगे आढळून आले. या वन हद्दीत मोठ्या प्रमाणात हरिण, सांबर चितळ यासह हरणांच्या विविध जाती आणि वन्य जीव आढळतात.