२२ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केळीच्या कांदे बागाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:28+5:302021-04-15T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी बुधवारी ...

22 km Damage to banana orchard due to high winds | २२ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केळीच्या कांदे बागाचे नुकसान

२२ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केळीच्या कांदे बागाचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता, तसेच जळगाव तालुक्यातील गिरणा व तापीच्या पट्ट्यात बुधवारी दुपारी दोन वाजेपासून वाहणाऱ्या 22 कि.मी. वेगाच्या वाऱ्यांनी केळीच्या कांदे बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्हाभरात पाऊस नसला तरी वादळामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे तापमानातदेखील घट झाली असून, बुधवारी शहराचा पारा 38 अंशांपर्यंत खाली आला होता, तसेच किमान तापमानातदेखील घट झाली असून, वाऱ्यामुळे अधिक गारवा निर्माण झाला होता. रबीची पिके काढली गेल्यामुळे या वाऱ्यामुळे शेतीचे फार नुकसान झाले नसले तरी कठोरा, भादली, करंज, आव्हाने, गाढोदे, पळसोद, फुपनगरी, नांद्रा या भागातील केळीच्या कांदे बागाचे नुकसान झाले आहे, तसेच ऐन काढणीवर असलेल्या मृग बागाचेदेखील काही भागांत नुकसान झाले आहे, तर मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे कडबादेखील ओला झाल्यामुळे चाऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रकाश संश्लेषणच्या प्रक्रियेवर होणार परिणाम

जिल्ह्यात आता केळीच्या कांदे बागेची लागवड करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत केळीचे झाड खांद्याबरोबर वाढलेले आहे. अशा परिस्थितीत पुढील वाढीसाठी केळीच्या पानांद्वारे प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया होऊन झाडाची वाढ अवलंबून असते. मात्र, बुधवारी आलेल्या वादळामुळे केळीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊन झाडाची पुढील वाढ खुंटू शकते, तसेच पुढील महिन्यात तापमान वाढ झाली तर केळीला त्याचा फटकाही बसू शकतो, अशी माहिती प्रगतिशील शेतकरी डॉ. सत्त्वशील जाधव यांनी दिली.

अजून तीन दिवस पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून पूर्व उत्तर प्रदेश व बिहारमधील काही भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने व बंगालच्या उपसागरातील आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राचा दिशेने येत असल्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजून तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होऊन 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Web Title: 22 km Damage to banana orchard due to high winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.