गाडी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या २२ जणांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:58+5:302021-07-29T04:17:58+5:30
जळगाव : जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली असून गेल्या वर्षी ७२१ अपघातात ४७१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ...
जळगाव : जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली असून गेल्या वर्षी ७२१ अपघातात ४७१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५६८ जण जखमी झालेले आहेत. यातील मोबाईलवर बोलत असताना अपघात होऊन किमान २२ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविणाऱ्या ९९८ जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, हेल्मेटचा वापर करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा जीव वाचल्याचीही उदाहरणे आहेत.
‘ब्रेथ ॲनालायझर’वरील धूळ हटेना
कोरोनाचा प्रसार आता कमी झाला असला तरी ‘ब्रेथ ॲनालायझर’ यंत्र वापरण्याची परवानगीच मिळालेली नसल्याने मद्यपींवर कारवाई करताना पोलिसांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधी जानेवारी महिन्यात शहर वाहतूक शाखेच्या ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ या अत्याधुनिक वाहनातील ‘ब्रेथ ॲनालायझर‘ द्वारे १२ तर फेब्रुवारी महिन्यात ५ अशा १७ तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या कारवाया झाल्याच नाहीत.
हेल्मेट नसल्याने गेला १२ जणांचा जीव
१) महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी अनेक दुचाकीस्वार स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करतात. गेल्या दोन महिन्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे, त्यात १२ ते १५ जणांनी हेल्मेटचा वापरच केलेला नव्हता.
२) बुधवारी ममुराबाद येथील दुचाकीस्वार तरुणाचा विदगावजवळ चारचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. या तरुणानेही हेल्मेट घातलेले नव्हते. हेल्मेट असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.
३) गेल्या काही दिवसापूर्वी वडली येथे हॉटेल कृष्णाजवळ एका दुचाकीस्वार तरुणाचा अपघात झाला होता. त्यात तरुणाने हेल्मेट परिधान केले होते, त्यामुळे त्याचा जीव वाचला होता.
२०२० मध्ये जिल्ह्यात झालेले अपघात
अपघात -७२१
मृत्यू- ४७१
जखमी-५६८
या वर्षात केलेला दंड
वाहन चालविताना मोबाईलचा वापर-९९८
१९९६००
विना हेल्मेट गाडी चालविणे- ११८८६
५९४३०००
सिग्नल तोडणे- २४
४८००
प्रेशर हॉर्न- २३
११५००
ओव्हरलोड- ०१
२००
वायुप्रदूषण - ००
००