२२०० शाळांमध्ये शिजणार सुट्टीतही खिचडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 05:11 PM2019-05-01T17:11:41+5:302019-05-01T17:14:17+5:30
शिक्षण विभागाने जारी केले निर्देश; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर तर कारवाईचेही संकेत
चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यात बहुतांशी भागात दुष्काळाने वेढा दिल्याने मे महिन्याच्या सुट्यांमध्ये शाळेत खिचडी शिजविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये खिचडी शिजवली जाणार असून मुख्याध्यापकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांमध्ये मात्र सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.
राज्यात यंदा भयावह दुष्काळाचे सावट आहे. २६ जिल्ह्यातील ४० हजार २८८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये मुलांना मे महिन्याच्या सुट्टीत शिजवून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे. याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जारी केले आहे.
चार तारखेपासून प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. सुट्या १६ जून अखेर असतील. सुट्टीच्या कालावधीतही मुलांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासनाचा उद्देश चांगला असला तरी, मे महिन्यात मुले शाळेत येत नाही. पालकांना समज देऊनही ते मुले शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे योजनेला हरताळ फासण्याची शक्यताच अधिक आहे. पोषण आहार शिजवून तो वाया गेल्यास याला जबाबदार कोण ? असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. ज्या भागात मुलांना दुष्काळात अन्न उपलब्ध होत नाही. तिथेच पोषण आहार देणे योग्य होईल. सरसकट शाळांमध्ये ही योजना लागू करु नये. असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
तीन तास थांबावे लागणार
पोषण आहार शिजवण्यासह वाटपाचे नियोजन मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. यासाठी उपशिक्षकांना कामे देण्यात यावी. महिनावर नियोजनात प्रत्येक दिवशी शिक्षकांची ड्युटी असेल. संबंधित शिक्षकाने शाळेत सकाळी सात वाजता उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बचत गटांकडून पोषण आहार शिजवायचा आहे. सकाळी ९ ते १० यावेळात पोषण आहाराचे वाटप करावयाचे आहे.
हलगर्जीपणा केल्यास कारवाई
सुट्टीमध्ये पोषण आहार शिजवण्यासह मुलांना वाटप करण्यात हलगर्जीपणा झालास शिक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी भरारी पथकेही नेमली गेली आहेत. दुष्काळात पोषण आहारापासून मुले वंचित राहू नये. यासाठी ही योजना आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना कार्यवाहीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. - बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, जळगाव.