भुसावळच्या २३ सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 02:18 PM2021-02-17T14:18:02+5:302021-02-17T14:18:53+5:30
भुसावळच्या २३ सायकलपटूंनी पाल सायकलिंग चॅलेंज बुधवारी पूर्ण केले.
भुसावळ : स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’ या १०० किलोमीटर व ५० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अवघड अशा या स्पर्धेत २३ सायकलपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. ५० किलोमीटरसाठी भुसावळ ते खिरोदा व पुन्हा परत भुसावळ असा मार्ग होता, तर १०० किलोमीटरसाठी भुसावळ खिरोदा पाल व त्याच मार्गे परत भुसावळ असा मार्ग होता. मार्गात ठिकठिकाणी सायकलपटूंचे उपस्थित ग्रामस्थ आस्थेने विचारपूस करीत होते व कौतुक करीत होते.
सकाळी सहाला उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. याप्रसंगी वाकचौरे यांनी सायकलपटूंनीअवघड अशा मार्गावर सायकल चालवणे आव्हानात्मक असून त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबविल्याबद्दल भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनचे अभिनंदन केले.
५० किलोमीटरसाठी ३ तास ३० मिनिटे तर १०० किलोमीटरसाठी ८ तास ३० मिनिटांचा कमाल कालावधी ठरविण्यात आला होता. सर्व सायकलपटूंनी निर्धारित वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली. सर्व यशस्वी सायकलपटूना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती संयोजक प्रवीण पाटील व ब्रिजेश लाहोटी यांनी दिली.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पूनम कुलकर्णी या महिला सायकलपटूने १०० कि.मी. गटात प्रतिनिधित्व करून ही स्पर्धा सहजपणे पूर्ण केली. त्यांच्याशिवाय सीमा पाटील व सोनाली पाटील यांनीदेखील ५० किलोमीटरमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. तसेच प्रशांत अत्रे यांनी १०० किलोमीटरचे अंतर सिंगल गिअरच्या सायकलने सहज पूर्ण केले. पालचा सातपुडा डोंगर पार करणे आव्हानात्मक होते परंतु भुसावळ रनर्सच्या सदस्यांनी ठिकठिकाणी केलेली पाणी व फळांची व्यवस्था तसेच त्यांनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही ही स्पर्धा सहजपणे पूर्ण करू शकलो, असे अँड.दिलीप जोनवाल व डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले.
भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रिया पाटील व हर्षल लोखंडे, खिरोदा येथे शेख रिजवान व श्रीकांत नगरनाईक तर पाल येथे अजय पाटील व राजेंद्र ठाकूर हे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेची नोंद घेत होते. ही संपूर्ण स्पर्धा भुसावळ तालुक्यातील प्रथम बीआरएम विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेआधी पूनम भंगाळे यांनी वॉर्मअप घेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, रणजित खरारे, स्वाती फालक, चारुलता अजय पाटील, प्रमोद शुक्ला, सरोज शुक्ला यांनी सहकार्य केले.
सहभागी स्पर्धक : अथर्व शितोळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर सोनवणे, चेतनकुमार शाह, दत्तू सपकाळे, जयश्री पाटील, कैलास छाबरा, नितीन साळुंके, नितीन रमानी, प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, सीमा पाटील, उमेश घुले, योगेश लुंकड, डॉ.महेश फिरके, डॉ.तुषार पाटील, प्रशांत अत्रे, पूनम कुलकर्णी, अँड.दिलीप जोनवाल.