महापालिकेचे २३ कर्मचारी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:38+5:302021-03-25T04:16:38+5:30
काम असेल तरच महापालिकेत मिळणार प्रवेश : मनपाच्या कामकाजावरही परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची ...
काम असेल तरच महापालिकेत मिळणार प्रवेश : मनपाच्या कामकाजावरही परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आता शासकीय कार्यालयांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरात वाढत जाणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस झटत असताना, आता महापालिका कर्मचाऱ्यांवरच कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. सद्यस्थितीत महापालिकेचे २३ कर्मचारी व अधिकारी कोरोनाने बाधित झाले असून ३० ते ३५ कर्मचारी क्वारंटाइन आहेत.
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी कपिल पवार व उपायुक्त संताेष वाहुळे हे गेल्या आठवड्यात बाधित झाले आहेत. त्यापाठाेपाठ प्रभाग अधिकारी विलास साेनवणी व एस. एस. पाटील या दाेन्ही प्रभाग अधिकाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभागांची जबाबदारी प्रभाग अधिकारी उदय पाटील व बाळासाहेब चव्हाण यांच्याकडे साेपवली आहे. नगरसचिव सुनील गाेराणे यांचाही काेराेनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे विधी विभागाचे अधीक्षक रवींद्र कदम यांच्याकडे अतिरिक्त पदभार साेपवला आहे. मनपा प्रशासनाकडून एकीकडे मालमत्ता कराची वसुली मोहीम सुरू असताना, दुसरीकडे अनेक कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.
काम असेल तरच महापालिकेत प्रवेश
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर महापालिका प्रशासनाने नागरिकांना काम असेल तरच महापालिकेत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक नागरिक किरकोळ कामासाठी देखील महापालिकेत गर्दी करत असल्याने आता महापालिका प्रशासनाने प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांना महापालिकेत प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेचे सुमारे २३ कर्मचाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी त्यांच्या संपर्कात आलेले अन्य कर्मचारीही क्वारंटाइन झाल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे काेराेना नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी पालिकेच्या यंत्रणेवर असताना पालिकेचे अधिकारी व कर्मचारीच बाधित हाेत असल्याने त्याचा कामावर परिणाम हाेत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचे संकट आणि वसुलीचेही आव्हान
महापालिकेत सुमारे ८०० हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यात कोरोनाचे संकट असल्याने महापालिकेचा निम्मा स्टाफ कोरोनावरील नियंत्रणाच्या कामात व्यस्त आहे. त्यातच महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराच्या वसुलीचे आव्हान देखील पार पाडावे लागणार आहे. एकीकडे राज्य शासनाकडून शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी करण्याचे आव्हान केले जात असताना, दुसरीकडे महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या, शहरात कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या व मालमत्ता कराच्या वसुलीचे काम यामुळे महापालिकेतील कर्मचारी कपात देखील महापालिका प्रशासनाला नाइलाजास्तव करता येत नाही.
महापालिकेत मनुष्यबळ कमी असल्याने पूर्ण क्षमतेने काेराेना उपाययाेजनांसाठी त्याचा वापर करता येत नसल्याची खंत व्यक्त हाेत आहेे. त्यात काेविड केअर सेंटरची व्यवस्था, त्या ठिकाणी सेवासुविधा पुरविणे, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पथकांची नियुक्ती यासाठी कर्मचारी कमी पडत असल्याने पालिका प्रशासनाने तूर्ततरी कर्मचारी संख्या घटविण्याचा काेणताही निर्णय घेतलेला नाही.