जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू
By Ajay.patil | Published: September 26, 2023 02:08 PM2023-09-26T14:08:36+5:302023-09-26T14:09:02+5:30
जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.
जळगाव - जिल्ह्यात पावसाळ्याचा काळात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात २३ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर १३ जण सर्पदंशामुळे जखमी झाले आहेत. जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.
मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज, सर्पदंशानंतर तत्काळ उपचार न मिळणे अशा कारणांमुळे मृत्यू अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जिल्हा रुग्णालय, जिल्हा सरकारी उपरुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता बऱ्यापैकी उपचार चांगले मिळत असल्याने सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये रुग्णाचे जीव देखील वाचले आहेत. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या तालुक्यांमध्ये झाले मृत्यू
जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रावेर, मेहुणबारे, जामनेर,मारवड, सावद्यात प्रत्येकी एक, चाळीसगाव, भडगाव, पिंपळगाव हरेश्वर, चोपडा या ठिकाणी प्रत्येकी दोन तर पाचोरा तालुक्यात ८, अमळनेर ३ अशा एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्या सर्वाधिक मृत्यू हे केवळ रुग्णांनी सर्पदंशानंतर प्रथमोपचार न केल्यामुळेच झाले आहेत.