ऑक्सिजन प्लांटसाठी २४ तास टेक्निशियन नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 AM2021-04-24T04:15:44+5:302021-04-24T04:15:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गणपती रुग्णालयात असलेले ऑक्सिजन प्लांट सुरक्षित आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गणपती रुग्णालयात असलेले ऑक्सिजन प्लांट सुरक्षित आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ऑक्सिजनचे द्रव स्वरुपातून वायू स्वरुपात रुपांतर करण्याचा प्लांट कार्यरत आहे, तर गणपती रुग्णालयात हवेतूनच ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट आहे. या दोन्ही प्लांटवर सध्या २४ तास टेक्निशियन कार्यरत आहेत. नाशिक येथे झालेल्या वायुगळतीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यादरम्यान नाशिकच्या दुर्घटनेतून बाेध घेत जळगावात यंत्रणा अद्ययावत केल्याचे दिसून आले.
जळगाव शहरातील विविध रुग्णालयांमध्ये वायू स्वरुपातील ऑक्सिजन पुरवणारे दोन ठेकेदार आहेत. त्याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्रव स्वरुपातून वायू स्वरुपात करण्याचा प्लांट कार्यरत आहेत. या प्लांटची देखरेख करण्याची जबाबदारी डॉ. संदीप पटेल आणि संजय चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच गुरुवारी दुपारी दोन वाजता या प्लांटची पाहणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केली तेव्हा तेथे विनोद राठोड हे कार्यरत होते. तसेच ठराविक वेळाने बर्फ काढण्याची प्रक्रिया केली जात होती. सध्या या ठिकाणी दोन तंत्रज्ञ २४ तास कार्यरत आहेत. या प्लांटची क्षमता २० किलोलीटरची आहे. गुरुवारी दुपारी या प्लांटमध्ये ५ किलोलीटर ऑक्सिजन होता.
ऑक्सिजन नियंत्रणासाठीं जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन यांच्या समन्वयाखाली जिल्ह्यात ऑक्सिजन नियोजन सुरु असते. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणारे ठेकेदार यांच्याशी सातत्याने संवाद असल्याने व एक दिवसाआड ऑक्सिजन टँकर येत असल्याने शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनविषयी कुठलीच कमतरता जाणवत नाही, तसेच अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडरदेखील रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले.
गणपती रुग्णालयातील प्लांट हा ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट आहे. त्यामुळे आता या रुग्णालयाला बाहेरून ऑक्सिजन आणण्याची गरज राहिलेली नाही. रुग्णालयाला लागणारा कृत्रिम प्राणवायू हवेतूनच वेगळा करून रुग्णालयांपर्यंत पोहोचवला जातो. या ऑक्सिजन प्लांटची जबाबदारी कुणाल मराठे या तंत्रज्ञाकडे सोपवण्यात आली आहे. ‘लोकमत’ने पाहणी केली तेव्हा तंत्रज्ञ रुग्णालयात प्लांटची जबाबदारी पार पाडत होते.
ऑक्सिजन प्लांटची स्थिती
जीएमसीतील प्लांटची क्षमता २० किलो लीटर
गुरूवारी दुपारी उपलब्ध ऑक्सिजन ५ किलो लीटर
जीएमसीत २४ तासांत लागणारा ऑक्सिजन ८ किलो लीटर