११० शेतकऱ्यांच्या खात्यात २४ लाखांची भरपाई जमा; सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:41 PM2023-10-17T13:41:57+5:302023-10-17T13:42:31+5:30
मृत जनावरांनुसार भरपाई
- कुंदन पाटील
जळगाव : लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना २४ लाख ६ हजारांची भरपाई दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आली आहे.
राज्यात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता. लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो.
जामनेर व चाळीसगावला फटका
गेल्यावर्षी लम्पीचा सर्वाधिक फटका जामनेर तालुक्याला बसला होता. यंदा मात्र चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशी मिळते मदत
लम्पी आजाराने गाय किंवा म्हैस मरण पावल्यास तीस हजार रुपये, बैल किंवा ओढकाम करणारे जनावरे मरण पावल्यास २५ हजार रुपये तर वासरू किंवा लहान जनावरे दगावल्यास सोळा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार ११० शेतकऱ्यांना ही मदत दिली गेली आहे.
तालुकानिहाय भरपाई
तालुका-गाय-बैल-वासरे-भरपाई (लाखात)
चाळीसगाव-२०-१५-३८-१५.७२
धरणगाव-००-०२-०१-०.६६
एरंडोल-०२-०८-०८-३.८८
जळगाव-०१-००-००-०.३०
पाचोरा-०१-०२-०३-१.२८
एकूण-२७-३१-५२-२४.०६
पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम बाधीत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मदतही उपलब्ध केली जाईल.-शामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.