प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २५ रुग्णवाहिका मृत्यूशय्येवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:28+5:302021-03-09T04:18:28+5:30
जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना असलेल्या रुग्णवाहिकांपैकी २५ रुग्णवाहिका यांचा कार्यकाळ संपला असून नवीन रुग्णवाहिका घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव ...
जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना असलेल्या रुग्णवाहिकांपैकी २५ रुग्णवाहिका यांचा कार्यकाळ संपला असून नवीन रुग्णवाहिका घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच शासन खरेदी करून देणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली. ७७ आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १ रुग्णवाहिका कार्यरत आहे.
रुग्णवाहिकांचाच विमा नाही
जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकांचा विमा काढला जातो, मात्र, जिल्ह्यात या रुग्णवाहिकांचा विमाच काढला गेलेला नाही. यासाठी आता प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून त्यासाठी मंजुरी घेण्यात येणार असल्याचे समजते.
दोन रुग्णवाहिकांचा अपघात
जिल्ह्यातील कानळदा व कुऱ्हा या दोन आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचा अपघात झाल्याने त्या पूर्णत: निकामी झाल्या होत्या. त्या ठिकाणी आता पर्यायी व्यवस्था म्हणून रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. शिवाय नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
कॉल घटले
आरोग्य केंद्रांमधून जिल्हा रुग्णालयात रुग्ण हलविण्यासाठी रुग्णवाहिका असतातच मात्र, गेल्या वर्षी कोविड असल्याने ही सेवा बंदच होती, शिवाय आताही रुग्णवाढत असल्याने लोकही या रुग्णवाहिकेत येण्यासाठी घाबरत असल्याने या रुग्णवाहिकांचे कॉल कमीच असल्याची माहिती आहे. शिवाय १०२ व १०८ रुग्णवाहिका आल्यामुळे यांचे मोठे सहकार्य होत असल्याचे सांगितले जात आहे.
७७ आरोग्य केंद्र
जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येकी एक रुग्णवाहिका कार्यरत आहे. यातील २५ रुग्णवाहिका या काहींचा २ लाख किमी किंवा दहा वर्ष कार्यकाळ अशा मुदत संपलेल्या आहेत. मात्र, दुरुस्त करून त्यांच्यावर गाडा हाकला जात आहे. उर्वरित ५२ रुग्णवाहिका सुस्थितीत असून यातून औषधांची ने-आण, रुग्णांची ने-आण केली जात असते. प्रसूतीसाठी घरून रुग्णालयात व रुग्णालयातून घरी अशी सेवा यातून दिली जात असते.