बाणगाव धरणातून २५ मोटारी जप्त, पाटबंधारे विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:53 PM2023-11-03T16:53:33+5:302023-11-03T16:54:47+5:30
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाणगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा असतानाही बेसुमार उपसा सुरु असल्याचे उघड झाले.
जळगाव : बाणगाव (चाळीसगाव) धरणातून अवैधरित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या २५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच जेसीबीद्वारे ३० सायपन यंत्रणाही उकरण्यात आली आहे. पाटबंधारे आणि महसुल विभागाने ही संयुक्तिकरित्या कारवाई केली.
रांजणगाव चे सरपंच प्रमोद चव्हाण तसेच ग्रामविकास अधिकारी दिलीप नागरे, कारकून गणेश देवरे यांनी सिंचनासाठी होणाऱ्या अवैध उपशाविषयी तक्रार केली होती. त्यानुसार पाचोरा लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारीक्षितिज चौधरी, चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहिम राबविण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाणगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा असतानाही बेसुमार उपसा सुरु असल्याचे उघड झाले. त्यानुसार पथकाने २५ मोटारी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर जेसीबीद्वारे जमिनीखाली टाकण्यात आलेल्या पाईप्स उकरण्यात आले. या ‘सायपन’ यंत्रणेला उकरल्यानंतर प्रशासनाने साहित्यही जप्त केले आहे. ही कारवाई सहायक अभियंता अक्षय देशमुख, लिपीक देविदास पाटील, चालक महाजन, चौकीदार आण्णा निकाळे, प्रमोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील, बाणगावचे सरपंच अरविंद परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.