25 लाखाचे पशुधन पडले मृत्युमुखी, मेंढपाळ संकटात
By admin | Published: March 30, 2017 12:23 AM2017-03-30T00:23:12+5:302017-03-30T00:23:12+5:30
रावेर : कुटुंबीय बुडाले शोकसागरात; जि.प.उपाध्यक्षांसह तहसीलदार,पशुसंवर्धन अधिका:यांची अंजदे शिवारात भेट
रावेर/ऐनपूर : मेंढय़ा मृत्युमुखी पडल्याने सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे उपजीविकेचे साधन असलेले पशुधन काही क्षणात संपल्याने शोकसागरात बुडालेल्या पशुधनपालक मेंढपाळांच्या कुटुंबीयांनी धाय मोकलून आकांत केला. प्रत्यक्षदर्शीचेही काळीज हेलावून सोडणारे विदारक असे चित्र होते. सुमारे 900 मेंढय़ा-शेळ्या व 60 ते 70 गुरे बुधवारी सकाळी 10. 30 वाजता चराईसाठी चिंचफाटा-रावेर अजंद्याकडे रस्त्याने येत होती. संबंधित मेंढपाळांनी विनायक काशिनाथ पाटील यांच्या केळी बागेतून रस्त्यापलीकडील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधील लिकेजमुळे साचलेल्या डबक्यातील पाणी तहानलेल्या पशुधनाला पाजले असता 191 मेंढय़ा व तीन शेळ्या काही क्षणातच शेजारच्या शेतात जागीच मृत्युमुखी पडल्या. पाण्यात विद्राव्य नत्र व पालाशयुक्त रासायनिक खतांचे मिश्रण असल्याने पाणी पिल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांत जनावरे जागीच मृत्युमुखी पडून मोठा हाहाकार उडाला. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यक डॉ. रणजित पाटील, डॉ. उदय ओतारी, डॉ. किशोर पाटील, डॉ.पी.पी.पाटील, डॉ.माळवी, डॉ.देवीदास तायडे, डॉ.राहुल फालक, डॉ. नेमाडे, डॉ.रामकृष्ण बारी आदींची कुमक घटनास्थळी धाव घेऊन दाखल झाली. त्यांनी तातडीने औषधोपचार केल्याने सुमारे 100 ते 150 मेंढय़ा व गुरे सुदैवाने बचावली आहेत.
दरम्यान, संबंधित मेंढपाळांच्या शोकाकुल परिवाराने सुमारे 20 लाख रुपयांचे पशुधन काही क्षणातच मातीमोल झाल्याने धाय मोकलून एकच टाहो फोडून आकांत केला. मेंढय़ा चराईसाठी रखवाली करणा:या युवकांचा टाहो मन सुन्न करणारा होता.
तहसीलदार विजयकुमार ढगे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि.प. सभापती सुरेश धनके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, अॅड. प्रवीण पासपोहे, संदीप सावळे, पांडुरंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आपदग्रस्त मेंढपाळांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून शासनस्तरावरून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. नंदकिशोर महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी घटनास्थळावरूनच संपर्क साधून दुर्घटनेची माहिती दिली.
जानकरांच्या स्वीय सहायकांनी घेतली माहिती
पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेवराव जानकर यांचे स्वीय सहायक डॉ. दळवी यांनी घटनेची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मृत मेंढय़ा, शेळ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसाह्य करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा पशुवैद्यकीय सहायक आयुक्त डॉ.बी.आर.नरवाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.नीलेश चोपडे व डॉ.पी.बी.भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, डॉ. नरवाडे यांनीही मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. मृत जनावरांचा व्हिसेरा व विषबाधा झालेल्या पाण्याचे नमुने त्यांनी रासायनिक पृथ्थकरणासाठी ताब्यात घेतले. मंडळाधिकारी हर्षल पाटील, तलाठी एन.आर.चौधरी यांनी पोलीस पाटील दादाराव पाटील व ग्रामसेवक एकनाथ कोळी यांच्या समक्ष पंचनामा केला. त्यांनी लक्ष्मण देमा शिंदे यांची 170 जनावरे, शंकर तान्हू शिंदे यांची 95 जनावरे, येन्हाबाई शिंदे यांची 15 जनावरे, सोमा ठोंबरे 20 जनावरे, तुकाराम केसकर यांची 15 जनावरे अशी 315 मेंढय़ा दगावल्याचा पंचनामा केला. त्यामुळे, सुमारे 25 लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे. (वार्ताहर)