जळगाव जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील उडीद,मूग उत्पादकांना मिळणार विम्याची २५ टक्के रक्कम
By Ajay.patil | Published: September 10, 2023 06:59 PM2023-09-10T18:59:31+5:302023-09-10T18:59:51+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना : कापूसाठीही काढली जाणार अधिसूचना ; गिरीश महाजनांची माहिती
जळगाव - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २७ महसूल मंडळांमध्ये २१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड राहिल्यामुळे उडीद व मूग या पीकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २७ महसूल मंडळातील उडीद व मूग उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाईची २५ टक्के रक्कम लवकरच मिळणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर आलेल्या अहवालानुसार ही २५ टक्के रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी काढली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची ६ हजार रुपयांची २५ टक्के रक्कम लवकरच प्राप्त होणार आहे. यामुळे पावसाअभावी उत्पादनात नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे.
इतर पीकांसाठीही १० दिवसात निघणार अधिसूचना - गिरीश महाजन
सर्वसमावेशक पीक विमा योजनेतील निकषानुसार हंगामातील प्रतिकुल परिस्थितीच्या २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाईची अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार उडीद, मूग या पीकांच्या नुकसानीची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसेच कापूस, सोयाबीन व इतर खरीप पीकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून, याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या असून, येत्या दहा दिवसात इतर पीकांसाठीही जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.