25 गावांना पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 12:11 AM2017-03-03T00:11:41+5:302017-03-03T00:11:41+5:30
जामनेर तालुका : टँकर व विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे
जामनेर : तालुक्यातील 32 लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये आजच्या स्थितीत सरासरी 40 टक्के जलसाठा शिल्लक असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाकडून टंचाई निवारण आराखडय़ाचे काम पूर्ण झाले असून एकूण 155 गावांपैकी 25 गावांचा या आराखडय़ामध्ये समावेश झाला आहे.
25 गावे टंचाई आराखडय़ात
तालुक्यामध्ये यावर्षीही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असून ज्या 25 गावांचा संभाव्य टंचाई आराखडय़ात समावेश करण्यात आला आहे, त्यामध्ये ओझर बु.।।, हिंगणे न.क., ओझर खुर्द, मालदाभाडी, कालखेडा, कोदोली, पहूर कसबे, पहूरपेठ, जांभोळ, वाघारी, मोहाडी, नांद्रा प्र.लो, हिवरखेडा दिगर, हिवरी दिगर, डोहरी, रामपूर, गणेशनगर, जंगीपुरा, जुनोना, वसंतनगर, पठाडतांडा, बोरगाव आदी गावांचा समावेश आहे.
या महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता?
तालुक्यामध्ये 32 लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्प असून आज रोजी काही प्रकल्प गाळ पातळीवर आले आहे. आराखडय़ात समावेश झालेल्या 25 गावांना येत्या पंधरा ते वीस दिवसात पाणीटंचाईची झळ बसणार असून या महिन्यामध्येच या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सूत्राकडून समजते. तसेच सद्य:स्थितीत काळखेडा या गावातील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला असून अजून काही गावांमध्ये विहीर अधिग्रहण होणार असल्याचे समजते. मुख्य जलस्त्रोत असणा:या वाघूर धरणात सध्या 84 टक्के जिवंत जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे जामनेर शहराला टंचाईची झळ बसणार नाही. परंतु काही प्रकल्प गाळ पातळीवर असल्यामुळे 20 ते 25 दिवसात टंचाईची तीव्रता अधिक असेल. त्या आनुषंगाने प्रशासनाकडून टँकरची जय्यत तयारी करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
या वर्षी टँकरचे प्रमाण कमी
तालुक्यात मागील वर्षी दुष्काळामुळे 70 ते 80 गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते व 47 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तसेच 74 गावांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी सर्वात जास्त टँकर जामनेर तालुक्यात सुरू होते. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे तालुक्याला टंचाईची झळ कमी बसणार आहे व मागील वर्षापेक्षा टँकरची संख्या कमी राहणार आहे.
(वार्ताहर)
धरणांची स्थिती
लघु पाटबंधारे विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार लोंढरी 33 टक्के, शेरी 18 टक्के, मोयगाव 42 टक्के, पिंपळगाव गोलाईत 22 टक्के, सोनाळा 7 टक्के, हिजरानाला 52 टक्के, पाळधी 49 टक्के, वाकडी 21 टक्के, शहापूर (गाळ पातळी), सूर 46 टक्के, शेंदुर्णी 23 टक्के, गोंडखेड (2) 15 टक्के, घोगडीनाला (गाळ पातळी), सुनसगाव (गाळ पातळी), देव्हारी 9 टक्के, कांग 90 टक्के, मोहाडी (खाली), माळपिंप्री 33 टक्के, गोंडखेड (1) 40 टक्के, माहूरखेडा 58 टक्के, भागदरा 39 टक्के, लहासर 51 टक्के, मोयखेडा दिगर 54 टक्के, शेवगा 67 टक्के, गोंदेगाव 57 टक्के, चिलगाव 13 टक्के, भिलवाडी 13 टक्के, पिंपळगाव वाकोद 6 टक्के, तोंडापूर 52 टक्के, हिवरखेडा लपा 43 टक्के, पिंप्री लपा 44 टक्के, गोंद्री 34 टक्के एवढा जलसाठा या प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे.
तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार केलेला आहे. त्यामध्ये 25 गावांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेले आहेत. तसेच या महिन्याच्या अखेर टँकर व विहीर अधिग्रहण होण्याची शक्यता आहे.
-डी.के. बोरवले, पाणीटंचाई विभाग, पंचायत समिती, जामनेर