उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामांतरासाठी २५ वर्षांचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:28 PM2018-03-23T12:28:09+5:302018-03-23T12:28:09+5:30
बहिणाबार्इंच्या नावासाठी मोर्चा, पदयात्रा, उपोषण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रस्ताव मांडण्यासह मोर्चे, पदयात्रा, उपोषण असे आंदोलन करीत मोठा लढा जळगाव जिल्ह्यात देण्यात आला व अखेर विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याने या लढ्याला यश आल्याचा आनंद असल्याचे जिल्हावासीयांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी सर्वच संघटना, सामाजिक, शैक्षणिक पातळीवरून यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
विविध संघटना आल्या एकत्र
या मागणीसाठी जळगाव येथे बहिणाबाई स्मारक समिती, लेवा पाटीदार महासंंघ, छावा संघटना, मराठा महासंघ, बंजारा क्रांती इत्यादी संघटनांनी एकत्र येत जळगावात मोर्चा काढला व विद्यापीठास बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली.
बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्रा
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही २०११पासून यासाठी लढा सुरू आहे. २०१२मध्ये या मागणीसाठी बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. या सोबतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यासह जिल्ह्यात येणाऱ्या नेत्यास निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवादरम्यानही प्रत्येक मंडळाजवळ मागणीचे फलक लावण्यात येऊन आपला लढा चालूच ठेवला. या मागणीसाठी २० संघटनांसह प्रत्येक पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्षांनी पाठिंबा दिला होता.
शिवजयंती सोहळ््यातही मागणी
साधारण १६ ते १७ वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ, सरदार ब्रिगेड यांनी शिवजयंती सोहळ््यादरम्यान ही मागणी केली व नंतर त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
कुलगुरुंना निवेदन
१९९८मध्ये विद्यापीठस्तरीय विद्यार्थी परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मनोज दयाराम चौधरी यांनी तत्कालीन कुलगुरु एस.एफ. पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी केली व शासनस्तरावरही पाठपुरावा केला होता.
मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
स्मारकाचेही काम मार्गी लागावे
बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा येथे बहिणाबाईंचे स्मारक उभारले जात आहे, मात्र सध्या ते थंड बस्त्यात असल्याने हे कामही मार्गी लागावे, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. २०११पासून या स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली खरी, मात्र केवळ ४० टक्केच काम झाल्याने काहीशी नाराजी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तर यासाठी एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याने काम खोळंबले आहे.
वाड्याचाही विकास व्हावा
जळगावात बहिणाबाई यांचे वास्तव्य राहिलेला वाडादेखील असून या वाड्यात त्यांच्या वापराच्या वस्तू आहे. या वाड्याचेही जतन केले जावे, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.
१९९४मध्येही मागणी
विद्यापीठ स्थापनेच्या चारच वर्षानंतर विष्णू भंगाळे, महेश ढाके यांनी ही मागणी केली होती.
बºयाच वर्षापासूनची सर्वांचीच ही मागणी होती. यासाठी सर्वच समाजाचे मंडळी पुढे आले. आपल्या सर्वांच्या लढ्याला आज न्याय मिळाल्याने मोठा आनंद आहे. सरकारचे या बद्दल आभार.
- विष्णू भंगाळे, सिनेट सदस्य.
आमच्या लढ्याला अखेर यश आले असून विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याचा मोठा आनंद आहे.
- विनोद देशमुख.
खान्देशकन्येच्या नावाने आता विद्यापीठ ओळखले जाणार असल्याने याचा असोदेकर मंडळींसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.
- किशोर चौधरी, असोदा.
बहिणाबाई चौधरी यांचा उर्जास्त्रोत नवीन पिढीलाही मिळावा, यासाठी आपला प्रयत्न होता. त्यास यश आल्याचा आनंद आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथराव खडसे यांचे आभार.
- मुविकोराज कोल्हे.
या लढ्यात सर्वांनी पुढाकार घेत एकमुखी मागणी केल्याने हे सर्वांचे यश म्हणावे लागेल.
- मनोज दयाराम चौधरी, संस्थापक अध्यक्ष सरदार ब्रिगेड.