२५० परप्रांतीय बांधव गावी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:04 PM2020-06-01T13:04:27+5:302020-06-01T13:04:57+5:30
७ बसेसद्वारे भुसावळला रवाना
जळगाव : लॉकडाउनमुळे जळगावात अडकलेले पश्चिम बंगालमधील २५० परप्रांतीय बांधव रविवारी रात्री पश्चिम बंगालला रवाना झाले. भुसावळहून श्रमिक एक्सप्रेसने ते गावाकडे रवाना झाले.
जळगावातील सराफ बाजारात पश्चिम बंगालमधील वेगवेगळ््या जिल्ह्यातील परप्रांतीय बांधव गेल्या अनेक वर्षांपासून कामानिमित्त या ठिकाणीच स्थायिक झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बंगाली कारागिरांनीदेखील घराकडे परतायला सुरूवात केली आहे. रविवारी जळगावहून बंगाली कारागिर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मायटी यांनी येथील बंगाली कारागिरांना बंगालमध्ये रवाना करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर रविवारी हे बंगाली आपल्या कुटुंबासह गावाकडे रवाना झाले. जळगाव आगारातून ७ बसेसद्वारे या बांधवांना भुसावळला रवाना करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, आगार व्यवस्थापक नीलेश पाटील, वाहतूक अधिक्षिका नीलिमा बागूल आदी उपस्थित होते. एस. टी. बसने या बांधवांना भुसावळ रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यात आले. त्या ठिकाणाहून रात्री अकरा वाजता श्रमिक एक्सप्रेसने हे मजूर गावाकडे रवाना झाले. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा जळगावात परतणार असल्याचे महेंद्र मायटी यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.