जळगाव जिल्ह्यात अद्यापही 250 कि.मी. रस्त्यावर खड्डे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:09 PM2017-12-14T12:09:32+5:302017-12-14T12:16:35+5:30
‘खड्डेमुक्ती’चा शुक्रवार शेवटचा दिवस
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14- खड्डेमुक्त रस्ते करण्याची मुदत 15 डिसेंबर रोजी संपत असली तरी अद्यापही जिल्ह्यातील जवळपास 250 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी आहे. 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा अधिकारी करीत आहे. मात्र त्यातही खड्डे बुजविल्यानंतर पाऊस झाल्याने अनेक खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे त्यांचेही काम होणे बाकी आहे.
राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्त रस्ते करण्यात येण्याची घोषणा केली होती.
खड्डेमुक्तीच्या घोषणेमध्ये 15 डिसेंबरची मुदत उद्या संपत असल्याने या संदर्भात आढावा घेतला असता अद्यापही 250 कि.मी. रस्त्यांवरील काम बाकी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण साडेचार हजार कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 2000 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे याअंतर्गत बुजविण्यात येणार आहे. या 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 1750 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साधारण 90 टक्के काम झाले आहे. मात्र आता एकच दिवस शिल्लक असल्याने एका दिवसात 250 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे कसे शक्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बुजविलेल्या खडय़ांवर ‘पाणी’
2000 कि.मी. पैकी 1750 कि.मी लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले असले तरी त्यानंतर झालेल्या पावसाने खड्डे पुन्हा उघडे पडले आहे. या खडय़ांचेही अद्याप काम बाकी आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्तीची घोषणा हवेतच विरली की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
खड्डेमुक्तीच्या कामांतर्गत 90 टक्के काम झालेले असून उर्वरित काम 15 ते 20 डिसेंबर्पयत पूर्ण होईल.
- प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.