पदोन्नतीसाठी ‘कास्ट्राईब’कडून २५ला राज्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:10+5:302021-06-20T04:13:10+5:30
आरक्षणानुसार त्यांना तत्काळ पदोन्नती मिळावी, यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक ...
आरक्षणानुसार त्यांना तत्काळ पदोन्नती मिळावी, यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण राज्यात एकाच दिवशी महासंघाच्यावतीने आंदोलन करण्याबाबत निर्णय झाला. बैठकीमध्ये महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्यासह विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष व सांगली जिल्ह्यातील विविध शाखेचे जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते, अशी माहिती नाशिक विभागीय कार्याध्यक्ष व शिक्षक संघटनेचे राज्य अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर पारवे यांनी दिली.
२६ जून १९०२ रोजी दिवसी मागासवर्गीय समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केले आहे. हा दिवस आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांचे डावलले गेलेल्या पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय रद्द करून पुन्हा पदोन्नतीमधील आरक्षण देणेबाबत सुधारीत आदेश काढावा, अशी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने मागणी केली आहे. त्यासाठी काष्ट्राईब महासंघाच्यावतीने २५ जून २०२१ रोजी विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहितीही पारवे यांनी दिली.