शिवपुराण कथांमध्ये सोनपोत लांबविणाऱ्या २६ महिलांना कोठडीची हवा

By विलास बारी | Published: December 6, 2023 09:38 PM2023-12-06T21:38:35+5:302023-12-06T21:38:43+5:30

मध्यप्रदेशात विविध गुन्हे : पाच ग्रॅम सोने हस्तगत

26 chain snatching women in custody of jalgaon police | शिवपुराण कथांमध्ये सोनपोत लांबविणाऱ्या २६ महिलांना कोठडीची हवा

शिवपुराण कथांमध्ये सोनपोत लांबविणाऱ्या २६ महिलांना कोठडीची हवा

जळगाव: नाशिक, धुळे व अन्य ठिकाणी झालेल्या श्री शिवमहापुराण कथांमध्ये सोनपोत लांबविणाऱ्या मध्यप्रदेशातील २६ महिला व एक अल्पवयीन मुलगी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या. ही गँग मध्यप्रदेशातील असून त्यांच्यावर तेथे चोरी, घरफोडी, सोनपोत चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. दरम्यान, वडनगरी फाटा येथे सुरू झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या ठिकाणाहून लांबवलेल्या ३२ ग्रॅम सोन्यापैकी पाच ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून २६ महिलांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर अल्पवयीन मुलीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

वडनगरी फाटा येथे सुरू झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी सोनपोत चोरीसह चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २६ महिलांना अटक केली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या टोळीने मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक व धुळे याठिकाणी पार पडलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये हातसफाई केल्याचे उघड झाले.

ही टोळी मध्यप्रदेशातील धडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, धडेली चारभूजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील आहे. या टोळीतील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असून १३ संशयित एका गावातील तर ८ संशयित महिला एका गावातील अन्य इतर गावातील असल्याचे समोर आले असून त्यांच्याविरुद्ध तब्बल २१ गुन्ह्यांची नोंद आहे.

कथेच्या ठिकाणी सोनपोतवर असायचे लक्ष

पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी ही टोळी गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी लांबवित असे. या टोळीने मालेगाव, धुळे याठिकाणी पार पडलेल्या कथेमध्ये देखील हातसफाई केली. या टोळीकडून सुमारे ५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.

मौल्यवान वस्तू नेणे टाळा

शिवपुराण कथेच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असून गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडतात. पोलिस यावर लक्ष ठेवून आहेच मात्र भाविकांनी कथास्थळी जाताना मौल्यवान वस्तू नेणे टाळावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केले आहे.

Web Title: 26 chain snatching women in custody of jalgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव