२६ दिवस व्हेंटिलेटरवर...दोन महिने रुग्णालयात अन् कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:02+5:302021-01-01T04:12:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाने अनेकांना वेगवेगळे अनुभव दिले...वेगवेगळे धडे दिले...मात्र तब्बल अडीच महिने कोरोनाशी लढून त्यातही २५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने अनेकांना वेगवेगळे अनुभव दिले...वेगवेगळे धडे दिले...मात्र तब्बल अडीच महिने कोरोनाशी लढून त्यातही २५ दिवस व्हेंटिलेटरवर राहून सुजित विसपुते (वय ४८) यांनी कोरोनाला हरविले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ते दाखल होते आणि सुखरूप बरे होऊन समाधानाने घरी गेले. त्यांचा हा रुग्णालयातील प्रवास थक्क करणारा आहे.
शहरातील पिंप्राळा येथील रहिवासी सुजित विसपुते यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर २ सप्टेंबर रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरूवातीला त्यांना काही खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते. रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. पाराजी बाचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या काळात त्यांच्यावर उपचार केले. पुढील २५ दिवस ते अतिदक्षता विभागात होते. या कालावधीत त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. ते तब्बल ३० दिवस ऑक्सिजन पुरवठ्यावरही होते. अखेरीस दहा दिवस त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी करण्यात आले. दोन महिने या रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती ठिक असल्याच्या निष्कर्षापर्यंत डॉक्टर पोहोचले आणि ३ नोव्हेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, वडिलांना दुसरे जीवनच मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांचा मुलगा मयुर विसपुते याने दिली आहे.
कोविड नॉन कोविड दोनही उपचार
अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण असल्याने तत्काळ कोरोना टेस्ट याशिवाय सीटी स्कॅन करण्यात आला, रिपोर्टनुसार ४० पैकी ३२ इतका स्कोर समोर आल्याने चिंता वाढली होती. त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आले.
तज्ज्ञ काय म्हणतात...
एखाद्या रुग्णाच्या फुप्फुसामध्ये संसर्ग अधिक प्रमाणात झाल्यास त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन प्रकृती गंभीर होते. योग्य औषधोपचाराने आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार रुग्ण अशा स्थितीतून बाहेर येऊ शकतात असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.