२६ हजार नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:11+5:302021-05-11T04:17:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे अत्यंत कमी डोस प्राप्त होत असून यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे अत्यंत कमी डोस प्राप्त होत असून यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अद्याप २६११० नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, त्याच्या केवळ दहा टक्के डोस उपलब्ध होत आहेत. मात्र, दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्याला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ३३ हजारांवर डोस प्राप्त झाले आहेत. वयोगटानुसार त्यांचे केंद्रांना वाटप करण्यात आले आहे. शहरातील चार नवीन केंद्रांमध्ये मंगळवारपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
असे डोस असे लसीकरण
कोविशिल्डचे आजपर्यंत आलेले डोस ३ लाख ३० हजार २८०
कोविशिल्डचे आजपर्यंत झालेले लसीकरण ३ लाख २२ हजार ७०
कोव्हॅक्सिनचे आलेले डोस ४४ हजार ९४०
कोव्हॅक्सिनचे झालेले लसीकरण ४० हजार १४०
कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी असलेले लाभार्थी २६ हजार ११०
कोव्हॅक्सिन केवळ चेतनदास मेहता रुग्णालयात
शहरात लसीकरणाचे विविध केंद्र असून यातील सिंधी कॉलनीतील चेतनदान मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. बाकी अन्य केंद्रांवर कोविशिल्ड उपलब्ध राहणार आहे. यात गणपती नगरातील स्वाध्याय भवन व मेहरूण येथील मुलतानी हे केंद्र सोडल्यास महापालिकेच्या अन्य सर्व केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्यांचे लसीचे डोस व १८ ते ४५ वयोगटासाठीचे लसीचे डोस हे स्वतंत्र आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवून नियम पाळून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यंत्रणेने केले आहे.
वादामुळे दोनच केंद्र
१८ ते ४५ वयोगटासाठी ग्रामीण भागातही लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, वाद वाढल्याुळे अखेर ग्रामीण भागातील सेशन रद्द करून जळगाव शहरात मेहरूण परिसरातील मुलतानी रुग्णालय व गणपती नगरातील स्वाध्याय भवन या ठिकाणीच १८ ते ४५ वर्ष वयोगटाचे लसीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, हे या वयोगटासाठी स्वतंत्र केंद्र असून ८ हजार लसी या वयोगटासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे डॉ.चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात विविध आरोग्य केंद्रांवर ही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाद समोर आल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लसीकरणाच्या तक्रारी आणि बैठका
लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यात आरोग्य विभागाचे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनीही आढावा घेतला. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, आरोग्य समिती सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्य पोपेट भोळे, मधुकर काटे उपस्थित होते.
प्रत्येक आरोग्य केंद्राला लस
७७ आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १३० डोस असे १००१० डोस वाटप करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.