२६१ विद्यार्थ्यांना होणार पीएच.डी बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:15+5:302021-05-01T04:15:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संशोधनावर आधारित पीएच.डी.पदवी यंदा २९ व्या दिक्षांत समारंभात २६१ विद्यार्थ्यांना बहाल केली जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संशोधनावर आधारित पीएच.डी.पदवी यंदा २९ व्या दिक्षांत समारंभात २६१ विद्यार्थ्यांना बहाल केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.
मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठ बंद झाली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. परीक्षा देखील ऑनलाईन पार पडल्या. आता काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यामुळे यंदाचा दीक्षांत समारंभ हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दरवर्षी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पीएच.डी.बहाल केली जात असते. यंदा २६१ विद्यार्थ्यांना ही पीएच.डी.पदवी देण्यात येणार आहे. तसेच दीक्षांत समारंभासाठी ४९ हजार ७५३ इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र असून त्यापैकी नोंदणी केलेल्या २८ हजार ९८ स्नातकांना या दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक. चे ४३७ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे.