नवीन उपमहापौरांसह फुटलेले २७ नगरसेवक शहरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:32+5:302021-03-20T04:15:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधून फुटून नवीन २७ जणांचा गट तयार करून महापालिकेत सत्तांतर करणाऱ्या भाजपच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधून फुटून नवीन २७ जणांचा गट तयार करून महापालिकेत सत्तांतर करणाऱ्या भाजपच्या बंडखोर २७ नगरसेवकांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. तसेच नूतन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीदेखील शुक्रवारी सकाळी ११ वाजता भाजपच्या बंडखोर उमेदवारांसह महापालिकेत दाखल होऊन उपमहापौर पदाची सूत्रे हाती घेतली. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी महापालिकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
भाजपच्या २७ नगरसेवकांच्या एक गटाने बंडखोरी केली. या गटाने विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला मदत केल्याने महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर, तर फुटीर गटातून कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शिवसेनेकडून सहलीवर असलेले कुलभूषण पाटील यांच्यासह फुटीर २७ नगरसेवक शुक्रवारी जळगावात दाखल झाले. अडीच वर्षांच्या काळात रस्त्यांसह इतर विकासकामे झालेली नाहीत; त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय हा शहराच्या विकासकामांसाठी घेतला. कुठलाही घोडेबाजार यात झालेला नसल्याची माहिती या फुटीर नगरसेवकांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी नूतन उपमहापौर यांचा सत्कार केला. माजी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पती सुधीर पाटील, नगरसेविका पती कुंदन काळे हे भाजप बंडखोर यावेळी उपस्थित होते. गजानन मालपुरे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, आदी यावेळी उपस्थित होते.
गिरीश महाजनांनी केवळ आश्वासन द्यायचे काम केले
नूतन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह २७ नगरसेवकांनी माध्यमांशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा-जेव्हा आम्ही कामे घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जायचो, त्यावेळी आम्हाला केवळ आश्वासने मिळत असत. जी कामे झाली ती ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डात झाली. मग आपल्या वाॅर्डाचे काय? मतदारांना काय? उत्तरे द्यावयाची? अडीच वर्षांनी कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जायचे. यामुळे बंडखोरी करून शिवसेनेला पाठिंबा द्यायचा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतला. शिवसेनेची राज्यात सत्ता असल्याने विकासासाठी शासनाकडून निधीही आणता येणार आहे. शहराच्या विकासासाठीच आम्ही बंडखोरी केल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्ता बदलताच महापौर दालन पूर्ववत सतराव्या मजल्यावर!
महापौर कार्यालय पूर्वी सतराव्या मजल्यावर होते. अडीच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन महापौर सीमा भोळे यांनी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर आणले. आता महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आली. शुक्रवारी दुसऱ्याच दिवशी महापौर कार्यालय पूर्ववत सतराव्या मजल्यावर हलविण्यात आले आहे.