२७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल

By विलास बारी | Published: November 23, 2023 11:31 PM2023-11-23T23:31:19+5:302023-11-23T23:31:31+5:30

जिल्ह्यातील २७ स्वस्त धान्य दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे.

27 ration shops 'ISO' rating! | २७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल

२७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन! जळगाव राज्यात दुसऱ्यास्थानी तर विभागात ठरला अव्वल

विलास बारी

जळगाव :
जिल्ह्यातील २७ स्वस्त धान्य दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. राज्यात पुणेपाठोपाठ सर्वाधिक मानांकन जळगावला मिळाले आहेत. त्यात सर्वाधिक दुकाने जामनेरची आहेत. दरम्यान, आणखी ११ दुकानांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे मानांकनाचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ३७४ दुकानांची आयएसओ मानांकनासाठी निवड केली होती. त्यानुसार दि.११ ऑक्टोबर रोजी १८५ स्वस्त धान्य दुकानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दि.९ नोव्हेंबर रोजी आयएसओ प्रमाणिकरणासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आले होते. त्यातील २७ दुकानांना दि.२३ नोव्हेंबर रोजी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे.

११ प्रस्ताव सादर

दरम्यान, दि.२२ नोव्हेंबर रोजी जळगाव (१), धरणगाव (५), चोपडा (५) या तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या दुकानांनाही मानांकन मिळेल, असा विश्वास सुत्रांनी व्यक्त केला आहे.

अशा सुविधा उपलब्ध

दुकानांना व बाहेरील परिसराला रंगरंगोटी, दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, अंत्योदय रेशन कार्डधारक, प्राधान्य परिवारातील कार्डधारकांची संख्या, त्यांना मिळणारे धान्य, त्याचा दर आदींबाबत फलक मोठ्या अक्षरात तयार करण्याची कामे सुरू करण्यात आली. सोबतच रेशन दुकानातील मालाचे आवक-जावक रजिस्टरचीही नोंद ठेवण्यात आली. दुकानांचे रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने तयार करून ते स्वच्छ कसे राहील, याची दक्षता घेण्यात आली. सूचना फलक, अभिलेख नमुने चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आले.

तालुकानिहाय मानांकन प्राप्त दुकाने

जामनेर (६)- शेंदुर्णी, सामरोद, जामनेर शहर (२), पळासखेडे मिराचे, पाळधी.

एरंडोल-शहर (४)
पाचोरा -शहर (१)

यावल-आमोदे, यावल शहर (२), चितोड, साकळी.
रावेर-सावदा, खिर्डी, विवरे, रायपूर व वाघोदे खुर्द.

भडगाव-गोंडगाव.

Web Title: 27 ration shops 'ISO' rating!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.