सामरोद शिवारात विषबाधेमुळे 18 नीलगायी व 10 डुकरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:51 AM2019-05-29T11:51:12+5:302019-05-29T11:58:35+5:30
जामनेर तालुक्यातील सामरोद मोयखेडेदिगर रस्त्यावरील जंगलात डबक्यातील पाणी प्यायल्याने 18 नीलगायी व 10 रानडुकरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
जामनेर, जि. जळगाव - जामनेर तालुक्यातील सामरोद मोयखेडेदिगर रस्त्यावरील जंगलात डबक्यातील पाणी प्यायल्याने 18 नीलगायी व 10 रानडुकरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. विषबाधेचा हा प्रकार असल्याची शक्यता वन क्षेत्रपाल समाधान पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्राण्यांच्या शव विच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
सामरोद येथील चिंधू शिवराम नाईक यांचे शेताजवळ पाण्याचे डबके असून यातील पाणी प्यायल्याने नीलगायी व रानडुकरांचा मृत्यू झाला असावा. वन विभागातील अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच वन क्षेत्रपाल पाटील, वनपाल अशोक सपकाळे, व्हि.जी.कुलकर्णी, कल्याणसींग पाटील, चरणसींग चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस.व्यवहारे यांनी घटनास्थळी भेट दिली व डबक्यातील पाण्याचे नमुने घेतले.
सामरोद परिसरातील जंगलात नीलगाय, रोही व रानडुकरांची संख्या मोठी आहे. जंगलातील पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. जनावरांकडून शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने डबक्यातील पाण्यात विष टाकले असावे असा संशय आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पळासखेडे मिराचे येथे दुरईचे पीक खाल्याने 23 मेंढ्या व मुंदखेडे व केकतनिंभोरे येथे बैल दगावल्याची घटना घडली होती.