जळगाव जिल्ह्यात २८ टक्के बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:25+5:302021-01-08T04:50:25+5:30
जळगाव : जिल्ह्यात २० ते २४ या वयोगटातील तब्बल २८ टक्के महिलांचे लग्न हे वयाच्या १८ वर्षे आधी ...
जळगाव : जिल्ह्यात २० ते २४ या वयोगटातील तब्बल २८ टक्के महिलांचे लग्न हे वयाच्या १८ वर्षे आधी झाले असल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणातून उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात बाल विवाहविषयक प्रतिबंध अद्यापही योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे.
शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून बाल विवाह रोखण्यासाठी विविध कायदे आणले आहेत; मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही मुलींचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षाच्या अगोदर लावून देण्याचे प्रमाण कायम आहे. काही जण मुलगी १८ वर्षांची होण्याच्या आधीच लग्न ठरवून मोकळे होतात. आणि मुलगी १८ वर्षांची झाली की लगेच लग्न लावतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही बाब सर्रास आढळून येते.
मात्र जिल्हा प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यंत्रणेकडे कुणी तक्रार केली तरच त्यावर कारवाई केली जाते. तक्रार नसेल तर लग्नाच्या वेळी मुलीचे वय किती आहे, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
---
कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात बालविवाह वाढले
जिल्ह्यात कोरोनाच्या काळात आठ महिन्यांमध्ये शासकीय यंत्रणा कोरोना विरोधी लढ्यामध्ये मग्न होती. त्यामुळे या काळात अनेक मुलींच्या लग्न वयाच्या १८ व्या वर्षाच्या आधीच लागले होते. चोपडा, यावल या तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये लवकर लग्न केले जाते.
---
जिल्ह्यात ७०० बालसंरक्षक समित्या पाहतात काम
जळगाव जिल्ह्यात ७०० समिती गठीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकुण १५०२ महसुली गावे आहेत. त्यामुळे अजूनही जवळपास ५० टक्के गावांमध्ये बालसंरक्षक समितीच कार्यरत नाही. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सेवक आणि अंगणवाडी सेविका हे बालसंरक्षक आणि उपसंरक्षक म्हणून काम पाहत आहे. इतर गावांमध्ये समिती गठीत करण्याचे काम सुरू आहे.
---
पाच बालविवाह रोखले
जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत जिल्हा महिला आणि बालविकास विभागाने पाच बालविवाह रोखले आहेत. तक्रार आल्यानंतर संबंधित मुलीचे वय तपासून हे विवाह रोखण्यात आले आहेत. कुणालाही तक्रार द्यायची तर चाईल्ड लाइनच्या क्रमांकावर संपर्क साधावा.
---
जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात पाच बालविवाह रोखण्यात आले आहेत. कुणाचीही तक्रार आल्यास त्यावर लगेच कार्यवाही केली जाते. त्यानुसारच आम्ही विवाह रोखतो; मात्र पालकांनी विवाह न रोखल्यास कारवाई केली जाते. जिल्ह्यात त्यासाठी ग्रामसंरक्षक समित्यादेखील आहेत.
- विजय सिंग परदेशी, कोट.
---मंत्र्यांनीही केल्या होत्या सूचना
महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जळगाव दौऱ्यात अधिकाऱ्यांना बाल विवाहांकडे बारकाईने लक्ष देण्याच्या आणि योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.