बांधकाम कामगारांच्या पोटात २८ कोटींचे भोजन; लाभार्थ्यांच्या संख्येत १३ पटीने वाढ
By विलास बारी | Published: October 8, 2023 11:38 AM2023-10-08T11:38:41+5:302023-10-08T11:39:39+5:30
लाभार्थींच्या संख्येत या काळात एक दोन नव्हे, तर तब्बल १३ पटीने वाढ झाली आहे.
जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेचे लाभार्थी जळगाव जिल्ह्यात ‘दिन दुगना रात चाैगुना’ झाले आहे. त्यामुळेच अवघ्या नऊ महिन्यात या योजनेवरील खर्च २ कोटींवरून २८ कोटी २५ लाखांवर पोहचला आहे. लाभार्थींच्या संख्येत या काळात एक दोन नव्हे, तर तब्बल १३ पटीने वाढ झाली आहे.
राज्यातील २६ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रकालीन जेवण योजना ऑगस्ट २०२१ पासून सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर जिल्ह्यात भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रा. लि. या कंपनीसोबत करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान झालेले दुर्लक्ष, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना दिलेली मंजुरी या सर्व बाबी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण सपकाळे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड केल्या आहेत.
काम न झालेल्या ठिकाणी भोजन
nसाकेगाव, ता.भुसावळ ग्रा. पं.ने ५ मार्च २०२३ रोजी वेळू माता मंदिर येथे सुरू असलेल्या बांधकाम साइटवर ८११ कामगारांना भोजन पुरविण्याबाबत पत्र दिले. मात्र मंदिर परिसरात या काळात कोणतेही बांधकाम झालेले नाही.
- १२०० मतदार असलेल्या वसंतवाडी, (ता.जळगाव) या ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार १२ मार्च २०२३ पासून ११७४ कामगारांना भोजन दिल्याचे दाखविले
ग्रामपंचायतीकडून आलेल्या मजुरांच्या याद्यांना मंजुरी दिली आहे. ठेकेदाराने भोजन पुरविल्याचे डिलिव्हरी चलन सादर केले. त्याआधारे बिलांच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे. सात ते आठ ठिकाणी स्पाॅट व्हिजिट केल्या आहेत. अपूर्ण मनुष्यबळामुळे पडताळणी करता आली नाही. - चंद्रकांत बिरार, सहायक कामगार आयुक्त, जळगाव