जळगावात पाच टन खाद्य तेलासह २८ किलो लाडू, २४ किलो पेढा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:50 PM2018-11-02T12:50:36+5:302018-11-02T12:56:49+5:30
अस्वच्छ स्थितीत तयार केले जात होते पदार्थ
जळगाव : अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीत अन्नपदार्थ तयार करीत असल्याने जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने तपासणी करून तब्बल २८ किलो बेसणाचे लाडू, २४ किलो पेढा आणि ५ टन खाद्यतेल जप्त केले. ऐन सणासुदीत ही कारवाई झाल्याने खाद्य पदार्थ उत्पादनाच्या शुद्धतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
औद्योगिक वसाहत परिसरातील ई-१४ मधील मे. एम.व्ही. फूडस् या कंपनीमध्ये अन्न निरीक्षक विवेक पाटील, अनिल गुजर यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासह त्यांची साठवणूक केली जात होती. त्याची पाहणी करून त्यांचे नमुने घेऊन ५ हजार ६०० रुपये किंमतीचे २८ किलो बेसणाचे लाडू व ८ हजार ६४० रुपये किंमतीचा २४ किलो पेढा जप्त करीत तो नष्ट केला.
या सोबतच औद्योगिक वसाहतीमधीलच मे. विनायक ट्रेडिंग कंपनी येथेदेखील तपासणी केली असता तेथे सोयाबीनच्या खाद्य तेलाचे नमुने घेतले व संशयावरून तब्बल ४ लाख ६ हजार रुपये किंमतीचे ५ टन खाद्यतेल जप्त केले.
या सर्व वस्तूंचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.
सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, अनिल सोनार यांनी ही कारवाई केली.
सणासुदीत खाद्य पदार्थाबाबत संशय
दिवाळी सणाच्या काळामध्ये विविध प्रकारच्या मिठाईसह फरसाणला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यात हे पदार्थ तयार करताना अशुद्ध घटक पदार्थांचा वापर होण्यासह शुद्धतेबाबत दिवसेंदिवस संशय बळावत असून या कारवाईने त्यास एक प्रकारे दुजोराच मिळत आहे. त्यामुळे खाद्य पदार्थ खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.