चोपडा बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच २८ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:31 PM2021-05-18T21:31:26+5:302021-05-18T21:32:18+5:30
चोपडा बाजार समितीमध्ये यंदा ३१ मार्चअखेर २ कोटी ६ लाखांचे उत्पन मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : येथील बाजार समितीमध्ये या वर्षी कधी नव्हे, एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यंदा ३१ मार्चअखेर २ कोटी ६ लाखांचे उत्पन मिळाले आहे. त्यात बाजार समितीला निव्वळ नफा २८ लाख रुपये मिळाले आहेत. बाजार समिती स्थापनेपासून या वर्षीपर्यंत एवढे विक्रमी उत्पन्न कधीच मिळाले नव्हते. त्यात या वर्षी पुन्हा जेव्हा भुसारची जास्त आवक असते, त्याच वेळी बाजार समिती बंद ठेवली होती. सुरू असते, तर पुन्हा पंधरा ते सतरा लाख रुपये वाढ झाली असती.
या वर्षी सीसीआयने कापूस खरेदी विक्रमी अशी केली. त्यातून बाजार समितीला नफा जास्त मिळाला. शेतकऱ्यांची गैरसोय न झाल्यामुळे सहज जास्तीतजास्त कापूस मोजला गेला, तसेच व्यापारी वर्गाला त्यांनी खरेदी केलेला माल ठेवायला गोदाम भाड्याने दिल्याने त्यातून उत्पन्न वाढले. जास्त भाव असलेले पीक हरभराची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. पारोळा, यावल, जळगाव या तालुक्यातील हरभरा चोपडा मार्केटला खरेदीसाठी आला. यावर्षी चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीने हरभरा पिकास उच्चांकी असा भाव दिला. नेहमीच्या इतर खर्चासाठी या वर्षी बंधने घातली. खर्चाला आळा घातल्याने नफ्यातही वाढ झाली.
या वर्षी विक्रमी उत्पन्न मिळाल्याने सर्वपक्षीय नेते त्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, घनश्याम अग्रवाल यांनी सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.