जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:35 PM2018-06-28T12:35:05+5:302018-06-28T12:35:54+5:30
१५ जुलैपूर्वी द्यावा लागणार अहवाल
जळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापाठोपाठ आता जळगावात द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तयारीलादेखील सुरुवात झाली आहे. या बाबत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे (एमसीआय) जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयास पत्र प्राप्त होऊन तयारीबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार १५ जुलैपूर्वी तयारीचा अहवाल परिषदेला पाठवायचा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी दिली.
जळगावात सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातून सुरू करण्याविषयी एमसीआयकडे प्रस्ताव होता. त्यानुसार सर्व पूर्तता झाल्यानंतर एमसीआयने एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आॅगस्ट २०१८ पासून जळगाव येथे अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
एमसीआयकडून विचारणा
प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील वर्षापासून द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करावा लागणार असल्याने त्या दृष्टीने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयास पत्र देऊन काय तयारी आहे, या बाबत विचारणी केली आहे. त्यानुसार द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहे.
अधिष्ठातांनी घेतली मुंबईत भेट
द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी मुंबई येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, सह संचालक, वैद्यकीय सचिव यांची भेट घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
निवासस्थानांच्या जागेचा होणार उपयोग
द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी वाढीव मनुष्यबळही लागणार असून त्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार येथे वैद्यकीय अधिकारी व इतर जागा भरव्या लागणार आहे. तशी तयारीदेखील केली जात आहे. या सोबतच यंत्रसामुग्रीही, वर्गखोल्या व इतर खोल्या लागणार आहे. त्यासाठी रिकाम्या केलेल्या निवासस्थानाच्या जागांचा तसेच रक्तपेढी व इतर कक्षांच्यावरील जागांचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन आठवड्यात पाठवावा लागणार अहवाल
एमसीआयच्या पत्रानुसार येथे तयारी सुरू झाली असून काय काय उपाययोजना केल्या गेल्या व केल्या जाणार आहे, याचा अहवाल आता १५ जुलैपूर्वी एमसीआयला पाठवावा लागणार आहे.
द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत एमसीआयकडून पत्राद्वारे विचारणा करण्यात आली असून त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे. १५ जुलैपूर्वी त्याचा अहवाल पाठवायचा आहे.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.