कळमसरेत अतिवृष्टीने ३३७ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 08:24 PM2019-09-10T20:24:13+5:302019-09-10T20:25:14+5:30
२०० हेक्टरवरील पिके बुडाली
कळमसरे, ता.अमळनेर : परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात लहानमोठ्या ३३७ घरांची पडझड झाली.सुमारे २०० हेक्टर शेतातील पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. कळमसरसह खेडी व वासरे परिसरात झालेल्या पावसामुळे त्या गावांचे ओसंडून वाहणारे पाणी येथील नाल्यात शिरले. मागच्या वर्षी लौकवर्गणीतून बांधलेल्या हरषा तलावाला सांडवा नसल्याने तुडूंब भरलेले तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतातून वाहत विकास सोसायटी, मस्जिद इमारत, पाडळसे फाट्यापासून भिल्ल वसाहत, वडारवाडीत शिरले. बसस्थानक परिसरात नाल्याचे पाणी दाटल्याने इंदिरानगर, न्यू प्लॉट वसाहतीला वेढा बसला. संपूर्ण गाव पाण्याच्या वेढ्यात एखाद्या बेटासारखे वेढले गेले होते. हे पाणी शेतातून पांझरा नदीच्या दिशेने वाहत गेले.
२०० घरांचे पंचनामे
तहसीलदार ज्योती देवरे यांनी मारवड मंडळ अधिकारी शिंदे व अमळगाव मंडळाचे योगेश पवार यांच़्या नेतृृत्वाखाली २५ तलाठी, महसुल कर्मचाऱ्यांचा ताफा घरांच्या पंचनाम्यासाठी नियुक्त केलेला आहे. ९ रोजी दुपारपर्यत २०० घरांचा पंचनामा झाला. मधेच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काही वेळ काम थांबले होते.
कायमस्वरूपी उपाय हवा
भविष्यात पुन्हा असा प्रसंग उद्भवू नये यासाठी आतापासूनच कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पाडळसेत कोणतेही नुकसान नाही
पाडळसे गावाला पाण्याचा वेढा होता. मात्र यातून घरांचे कोणतेही नुकसान झाले नाही. ही पुनवर्सित वसाहत असल्याने येथे घरांना धोका पोचला नाही.