जामिनावर असलेल्या २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 07:44 PM2019-09-15T19:44:03+5:302019-09-15T19:44:13+5:30
लोन खुर्द येथील घटना : ६ लाखांच्या कर्जापायी झाला तुरुंगवास
वावडे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या लोन खुर्द येथील सचिन प्रल्हाद पाटील (वानखेडे) (वय २४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
सचिन हा नाशिक येथे एका कंपनीत कामाला होता. सुट्या असल्यामुळे तो आईवडिलांकडे गावी आला होता. त्याने अचानक रविवारी घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपविली.
याबाबत माहिती अशी की, मयत सचिन याच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे सहा लाखांचे कर्ज होते. कर्जाचे हप्ते नियमित न भरल्याने सचिनला अटक करण्यात आली होती. २२ दिवस तुरुंगात राहून त्याची जामिनावर सुटका झाली होती. तो सध्या जामिनावर होता, असे सांगण्यात आले. आत्महत्या करण्यापूर्वी तो आई-वडिलांसोबत शेतात काम करत होता. मात्र बरे वाटत नसल्याने त्याला आई-वडिलांनी घरी पाठवले होते. त्याने आत्महत्या केली तेव्हा फक्त आजी घरी होत्या.
सचिनच्या पश्चात आई वडील, आजी, एक भाऊ असा परिवार आहे. पोलीस पाटील तनुजा उदय पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.