यंदा प्रकाशकांकडून ३० टक्के पुस्तकांची छपाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:11+5:302021-06-04T04:13:11+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जूनच्या सुरूवातीपासून दुकानांमध्ये पालकांची पाल्याच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडत असते. ...
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जूनच्या सुरूवातीपासून दुकानांमध्ये पालकांची पाल्याच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडत असते. परंतु, यंदा नवीन शैक्षणिक वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, सुध्दा पालक शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी येत नसल्याचे पहायला मिळत आहे. केवळ वीस टक्के शालेय पुस्तकांची विक्री होत असून अजूनही मागणी कमी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दुसरीकडे मागील वर्षाचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रकाशकांकडून सुध्दा यंदा केवळ तीसचं टक्के पुस्तकांची छपाई केली आहे.
मागील वर्षी शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वी शाळा बंद झाल्या. मात्र, अनेक शाळांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले. दुसरीकडे कोरोनाचा फटका पुस्तक प्रकाशकांसह विक्रत्यांना देखील बसला. शाळांप्रमाणे पुस्तक प्रकाशकांनी सुध्दा ई-लर्निंग ॲप तयार केले. त्याद्वारे पुस्तके व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. पण, ई-लर्निंगला केवळ शहरी भागामध्ये प्रतिसाद मिळाला व ग्रामीण भागात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे प्रकाशकांकडून सांगण्यात आले. परिणामी,फक्त २० ते २५ टक्के ॲपचा वापर झाला. आता २०२१-२२ शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरूवात होईल. अभ्यासक्रमात बदल नसल्यामुळे मागील वर्षाचा साठा सुध्दा दुकानांमध्ये उपलब्ध आहे. तर नवीन साहित्य सुध्दा उपलब्ध होणार आहे. पहिली ते बारावी, तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, डिप्लोमा तसेच सीबीएसई शाळांमधील अभ्यासक्रमाचे पुस्तके दुकानांमध्ये विक्रीला उपलब्ध झाली आहे. मात्र, शाळा उघडतील की नाही, हा प्रश्न अजूनही कायम असल्यामुळे पालक शालेय साहित्य खरेदीसाठी येत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
=====
जुन्या पुस्तकांचाही पुनर्वापर
दरम्यान, २०२०-२१ या सत्रातील विद्यार्थ्यांना जी पाठ्यपुस्तके देण्यात आली होती. ती यंदा शाळेत जमा करून घेतली गेली आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार या पुस्तकांचा पुनर्वापर केला जाणार आहे. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितरित जाणार आहेत.
=====
अपेक्षित, गाईड धुळखात...
कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली असल्यामुळे काही प्रमाणात सुध्दा पालक शालेय पुस्तक खरेदीसाठी येत आहेत. वीसचं टक्के विक्री होत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे अपेक्षित, गाईड हे आता रद्दीत गेले आहे. नवीन पुस्तक उपलब्ध आहेत. मात्र, मागणी अजूनही कमी असल्याचे शैक्षणिक साहित्य विक्रेते जितेंद्र वाणी यांनी सांगितले.
=====
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. पुस्तकांची विक्री न झाल्यामुळे मागणीत घट झाली आहे. त्यामुळे तीसचं टक्के पुस्तकांची छपाई करण्यात आली. मागील साठा उपलब्ध आहे. केजीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी प्ले स्टोअरवर टीचर ऑनलाइन क्लास रुम हे ॲप उपलब्ध करून दिले होते. पण, पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, आता बालभारतीची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. औरंगाबाद येथून सर्व पुस्तके आणली जातात. एक ते दोन दिवसात पहिली ते बारावीची सर्व नवीन पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध होतील.
- सुहास चव्हाण, एरिआ सेल्स मॅनेजर, नवनीत पब्लिकेशन
====
गेल्या दीड वर्षापासून मुले घरातच बंद असल्यामुळे ती अनेक विकासात्मक गोष्टींना मुकली. मुलांचा टीव्ही आणि मोबाईलचा वापर प्रचंड वाढला. त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. तर काही घरातील मुले मोबाईलला कंटाळली. त्यांना दीड वर्षाच्या गुदमरलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी काहीतरी कृतीशिल हवे आहे. अनेक पालक व मुले कुतूहलमध्ये अवांतर पुस्तकांची मागणी करीत आहे. वाचायला हवे असे काहींना वाटू लागले आहे. तसेच घरपोच मिळालेल्या किटमधून चार दिवसात चार रोबोट बनवा यासारखी मुलांमधील व पालकांमधीलही कृतीशीलता वाव देणारे दोन वैज्ञानिक उपक्रम कुतूहलने आयोजित केले आहे. लॉकडाउननंतर मुले व पालक नाविन्याच्या शोधात आहेत.
- महेश गोरडे, कुतूहल फाउंडेशन
======
विद्यार्थी संख्या
- पहिली
मुले : ४०६३४
मुली : ३५८८०
-------
- दुसरी
मुले : ४२३६६
मुली : ३६९४७
-------
- तिसरी
मुले : ४२७५४
मुली :३५१६४
-------
- चौथी
मुले : ४३७६७
मुली : ३६२८३
-------
- पाचवी
मुले : ४३४१६
मुली : ३५४१२
-------
- सहावी
मुले : ४२१८२
मुली : ३५१२९
-------
- सातवी
मुले : ४२१६८
मुली : ३५५०९
-------
- आठवी
मुले : ४१७५९
मुली : ३४६२६