एकट्या जळगावात ३००० ॲक्टीव्ह केसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:22+5:302021-03-19T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरानाची रुग्णवाढ थांबत नसून एकट्या जळगाव शहरात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजारांवर पोहोचली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरानाची रुग्णवाढ थांबत नसून एकट्या जळगाव शहरात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजारांवर पोहोचली आहे. शहरात गुरूवारी २६४ नवे रुग्ण आढळून आले असून ३५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. गुरूवारी शहरात ॲन्टीजन चाचणीत १५० तर आरटीपीसीआर चाचणीत ११४ रुग्ण आढळून आले आहेत.
शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ग्रामीणमध्ये गुरूवारी ४५ नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या २७१ वर पोहोचली आहे. शहरात सातत्याने २५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहे. आठवडाभरात कोरोनाची ४०० पेक्षा अधिक उच्चांकी नोंद करण्यात आली होती. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने शहरात सक्रिय रुग्णांची संख्या ही ३ हजारांवर पोहोचली आहे.
जीएमसीत नियोजन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्णत: पुन्हा एकदा कोविड रुग्णालय घोषित होण्याची शक्यता असून जीएमसीत तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक कक्षाचा आढावा घेतला जात असून नॉन कोविड रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. ज्यांना उपचारांचीच गरज आहे, अशा रुग्णांना कोठे हलवायचे याबाबत चर्चा केल्या जात आहे. मनुष्यबळाच्या नियोजनाबाबत बैठका घेतल्या जात आहेत.
त्या महिलेची प्रकृती गंभीरच
सीटू कक्षात मृत्यू झालेल्या त्या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर होती. दाखल होताना त्या महिलेची ऑक्सिजन पातळी ही ७५ होती. त्यामुळे गंभीर असल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला असून खाली पडली म्हणून मृत्यूचा झाल्याचा प्रकार नसल्याचे स्पष्टीकरण डॉ. भाऊराव नाखले यांनी दिले आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तीचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले होते.