30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद - जगन्नाथ शिंदे
By admin | Published: May 24, 2017 01:17 PM2017-05-24T13:17:04+5:302017-05-24T13:17:04+5:30
राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेच्या राज्य बैठकीत जीएसटीसह विविध विषयांवर चर्चा
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.24- ऑनलाईन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर तब्बल 70 हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारच्यावतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने 30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारला असल्याची माहिती राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेची राज्य बैठक 24 रोजी जळगाव येथे केमिस्ट भवनात झाली. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे राज्य सचिव अनिल नावंदर, उपाध्यक्ष मदन पाटील, मुकुंद दुबे, सहसचिव अरुण बारसे, संघटक सचिव विनय श्रॉफ, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुष्टे, जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, सी.ए. गोविंद पटवर्धन उपस्थित होते.
ऑनलाईन औषध विक्री ही घातक असून त्याचे विपरीत परिणाम होत आहे.आरोग्य खात्यासह कुटुंबकल्याण मंत्रायल, पंतप्रधान कार्यालय येथे निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर 15 मार्च 2017 रोजी केंद्र सरकारने डॉ. हर्षवर्धन कांबळे यांच्या अहवालानुसार नोटीस काढल्या. या नोटीसची मुदत 15 एप्रिल रोजी संपली असली तरी त्यानंतर आतार्पयत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे शिंदे म्हणाले.
या बैठकीत जीएसटीविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले. जीएसटीचा औषध व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो व त्याच्या नोंदणाविषयी आवाहन करून जगन्नाथ शिंदे यांनी जीएसटीला संघटनेचा पाठिंबा राहील, असे सांगितले.
पंतप्रधानांनी जेनेरिक औषधी लिहून देण्याबाबत डॉक्टरांना आवाहन केले आहे, त्यानुसार जेनेरिक विषयावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक सुनील भंगाळे यांनी तर सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.