चोपडा तालुका कृषी विभागात ६७ पैकी ३१ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:37+5:302021-08-28T04:20:37+5:30
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले तालुका कृषी कार्यालय हे प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. जवळपास ६७ पदे मंजूर असून, त्यापैकी ३६ ...
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले तालुका कृषी कार्यालय हे प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. जवळपास ६७ पदे मंजूर असून, त्यापैकी ३६ पदे भरलेली आहेत तर ३१ पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचा शेती उत्पन्नासाठीचा मार्गदर्शनपर लाभ मिळत नसल्याने शेतकरी वाऱ्यावर तर कृषी कार्यालय प्रभारावर अशी स्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन कृषी विभागामार्फत माहिती दिली जाते; मात्र माहिती देणारे कृषी सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातून निघणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
प्रमुख पदच रिक्त
चोपडा अमळनेर रस्त्यावर वेले जवळ चोपडा तालुका कृषी कार्यालय आहे. या कृषी कार्यालयातील प्रमुख पद म्हणजे तालुका कृषी अधिकारी हेच पद गेले वर्ष ते दीड वर्षभरापासून रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार कृषी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. म्हणून नियमित तालुका कृषी अधिकारी हे पद तत्काळ भरण्याची मागणी होत आहे. त्यानंतर कार्यालयात कृषी अधिकाऱ्याची चार पदे मंजूर असून, दोन पदे भरलेले आहेत, तर दोन पदे रिक्त आहेत. कृषी पर्यवेक्षकांची सात पदे मंजूर असून, सहा पदे भरलेली आहेत, एक पद रिक्त आहे. कृषी सहायकांची ३७ पदे मंजूर असून, २० पदे भरलेली आहेत, तर १७ पदे रिक्त आहेत. सहायक अधीक्षक म्हणून एक पद मंजूर आहे तर ते पद भरलेले आहे. वरिष्ठ लिपिकाची ही एक पद मंजूर असून, तेही भरलेले आहे. कनिष्ठ लिपिक यांचे चार पदे मंजूर असून, एकच भरलेले आहे. तीन पदे रिक्त आहेत. अनुरेखकांची पाच पदे मंजूर असून, एक पद भरलेले आहे, तर चार पदे रिक्त आहेत. वाहनचालकाचे एक पद मंजूर असून, ते पद रिक्तच आहे आणि शिपायांची सहा पदे मंजूर असून, त्यापैकी चार पदे भरलेली आहेत तर दोन पदे रिक्त आहेत. असे तालुका कृषी कार्यालय अंतर्गत ६७ पदे मंजूर असून, त्यापैकी केवळ ३६ पदे भरलेली आहेत आणि ३१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे माहितीच्या अभावाने शेतकऱ्यांना त्याची झळ बसत असते आणि त्याचा दुष्परिणाम येणाऱ्या उत्पन्नावर होत असतो.
रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणीही शेतकरी संघटना आणि शेतकरी वर्गातून होत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कृषिविषयक माहितीचा लाभ होईल, योजनांची माहिती होईल, माती परीक्षण किंवा पिकांना कोणते खत द्यावे, याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकेल म्हणून ही सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
कोट....
दरम्यान, तालुका प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांना रिक्त पदांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर रिक्त पदांची माहिती वरिष्ठ कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी कळवलेली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी एक कृषी अधिकारी हे पद भरले आहे. कृषी अधिकारीबाबत आदेशही प्राप्त आहेत; मात्र ते अजून हजर झालेले नाहीत.
प्रशांत देसाई, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, चोपडा.