मुक्ताईनगर शहरात ३१ विंधन विहिरींना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:54 AM2019-05-12T00:54:05+5:302019-05-12T00:55:42+5:30
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी दिली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी दिली.
नगरपंचायतीने २८ फेब्रुवारी रोजी ठराव केला होता व शहरातील संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात विंधन विहिरींसाठी मंजुरी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्च महिन्यामध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानुसार भूजल सर्वेक्षण विभागाने मुक्ताईनगर शहरातील विविध ठिकाणी स्थळ निरीक्षण करून ३१ ठिकाणी विंधन विहिरी करण्याची शिफारस दिलेली आहे. त्यानुसार ३१ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली. यात आस्थानगरी, पंचायत समितीच्या मागे, आठवडे बाजार, आझाद मैदान, अलफलाह शाळेजवळ, अबूबकर यांच्या घराजवळ, आमिन खान यांच्या घराजवळ, शनि मंदिराजवळ, मटण मार्केटजवळ, भिलवाडीजवळील माळी डोंगरावर, आजम टेलर यांच्या दुकानाजवळ, हनीफ मन्यार यांच्या घराजवळ, शब्बीर खाटीक यांच्या घराशेजारी, इस्लामपुरा मदसा परिसर, खुशतर नबाब यांच्या घराजवळ, शब्बीर दलाल यांच्या घराजवळ, बशीत कुरेशी यांच्या घराजवळ, रहमान खान यांच्या घराजवळ, रफिक ताज महंमद यांच्या घरासमोर, भास्कर लवांडे यांच्या घराजवळ, सुभाष देशमुख यांच्या घराजवळ, अष्टविनायक कॉलनीत पुनर्वसन टप्पा तीन, लेवा समाज मंदिरासमोर, दत्तू सोनार यांच्या घराजवळ, शंकर पाटील यांच्या घराजवळ, हनुमान मंदिरासमोर, एन.आर.पाटील यांच्या घराजवळ, प्रवीण पाटील यांच्या घराजवळ, तसेच राम राणे व विजय भंगाळे यांच्या घराजवळ या विंधन विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
अध्यादेशाद्वारे आचारसंहिता शिथील झाल्यानंतर नगरपंचायतीने उपअभियंता, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद जळगाव यांच्या नवीन विहीर करण्याच्या तंत्रानुसार लवकरच या विंधन विहिरी शहरात करण्यात येणार आहे. नगरपंचायतीने ५० अश्वशक्तीच्या पंपाची दुरुस्ती तसेच लिकेज दुरुस्ती तत्काळ केलेली आहे. नागरिकांनीदेखील पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करून पंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी निविदा मागवली होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आचारसहितेनंतर पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी सांगितले.